Saturday, December 3, 2016

एक हजारी अर्ध हजारी


तारीख ८ नोव्हेंबर, वेळ रात्री ८ ची... ८ ला ८ च्या ठोक्याला आपल्या पंतप्रधान महोदयांच मेरे प्यारे देशवासींयो... प्यारे भाई बहनों... हे ब्रीद वाक्य तमाम जनतेच्या कानावर पडलं आणि क्षणातच भारत देशात हाहाकार माजला. गरीब-श्रीमंत, सामान्य-वीआयपी, शेतकरी-नोकरदार, दलाल-व्यापारी आणि विशेष म्हणजे व्हाईट मॅन ते ब्लॅक मॅनपर्यंत सर्वजणच हादरुन गेले. न्यूज चॅनलवर नोटाबंदी चालू असतानाच व्हाट्सअँपवरुन ही बातमी काही क्षणातच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली. १०-१५ मिनीटे होता न होता तोच व्हाट्सअँप वर विनोदी मेसेजनी थैमान घातलं.

एवढ्यातच आमच्या हजारीने पाचशीला फोन केला.
अर्ध हजारी    - हॅलो..... बोल गं
एक हजारी    - हॅलो..... अगं मी बोलते... हजारी
अर्ध हजारी    - हो... हो ओळखलं, मला वाटलेलचं तू फोन करणार ते.
एक हजारी    - काय, कशी आहेस.
अर्ध हजारी    - एकदम मस्त, तू कशी आहेस?
एक हजारी    - मी तर फस्तच... बरं, बातमी समजली का?
अर्ध हजारी    - नाही समजायला काय झालं, मी तर इथेच आहे.
एक हजारी    - कुठे?
अर्ध हजारी    - मेदीकाकांच्या खिशातच, सर्व काही आँखो देखा हाल कॉमेंट्री ऐकत आहे.
एक हजारी    - अरे व्वा... तू तर या सुवर्ण क्षणाची साक्षीदारच बनलीस म्हणायचं.
अर्ध हजारी    - हो गं, बरं तू कुठे आहेस?
एक हजारी    - अजून कुठे असणार... पवरकाकांच्या खिशात
अर्ध हजारी    - हीहीही... तू तर नेहमी त्यांच्याच खिशात असते. मला तर त्यांच्या खिशात चुकून कधीतरी राहायची संधी भेटली तर. पवरकाकांनी तर त्या शंभरी कींवा पन्नासीला नो एन्ट्रीचा बोर्डच लावून टाकलाय म्हणे…! हे खर आहे का?
एक हजारी    - खरंच आहे ते, अश्या छोट्यांना ते सोबत घेतच नाहीत. “हम सस्ते चिजोंका शौक नही रखतेंअसंच त्यांच असतं.
अर्ध हजारी    - त्यांच चालू दे... तू सांग, तूला आता कस वाटतयं?
एक हजारी    - कस वाटतय! मला तर बाई आनंदाच्या उकाळ्याच फुटल्या आहेत. पण फुटल मेल आमच ते नशीब या पवरकाकांच्या खिशात मी तर पुरती कोंबूनच गेली आहे.
अर्ध हजारी    - आता मात्र सुटलीस एकदाची
एक हजारी    - हो ना... बरीच वर्षे झालेली कधी एकदा बरबरटलेल्या लोकांच्या जाळ्यातून सुटते असंच झालेलं.
अर्ध हजारी    - हो गं... मागचे आपले घरमालक सिंगाकाका, आम्हाला बदलायला बघत होते पण त्यांना कोणी काही ते जमूच दीलं नाही.
एक हजारी    - सर्वच चोराचे साक्षीदार कस जमू देणार. ते बिचारे २५, ५० पै ला बंद करुन गप्प बसले.
अर्ध हजारी    - हो ना... कींमत नसलेल्यालाच झीरो करुन बसले.
एक हजारी    - त्यांच काही न बोललेलचं बरं, आपल्याला खुपच भ्रष्ट करुन सोडलं बाई त्यांनी... अगं मागच्या महीन्यात मी त्या अंबाभाईच्या घरी होते तेव्हा मला थोडीफार कूणकूण लागलेली, हे असं काहीतरी होणार याची.
अर्ध हजारी    - मेली तू कधी काही असं बोलली नाहीस?
एक हजारी    - कसं बोलणार, मी तर त्या हजारांच्या बंडलामध्येच कोंबून गेलेली. तोंड उघडायला जागाच नव्हती.
अर्ध हजारी    - त्यांच काय बाई, सगळचं त्यांच्या मुठ्ठी मे”
एक हजारी    - हो ना, पण खर सांगते हां... अगं आपल्यासाठी हपापलेले लोक ह्या निर्णयापर्यंत पोहचतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. शेवटी मेदीकाकांनी ते करुन दाखवलं.
अर्ध हजारी    - नाही गं... सर्वांनाच दोषी देवून नाही चालणार. या देशात बरेच प्रामाणिक माणसंदेखील आहेत जे आमचा वापर सन्मानाने करतात आणि मेहनतीचच स्विकारतात.
एक हजारी    - हे मात्र तूझ खरं आहे. अशी माणसं आहेत म्हणूनच तर आज हा निर्णय झाला. नाहीतर कुटच काय, लक्ष्मीच्या नांवाने आमची पूजा करायची आणि चुकीच्या मार्गांनी, बेहीशेबी, गोरगरीबांना लुबाडूण मर्यादेपेक्षा आमची साठवणूक करायची.
अर्ध हजारी    - मनातलं बोललीस बाई तू, या निर्णयाने बड्याबड्यांच्या पोटात दुखणार, काहींच्या झोपाही उडतील तर काहीजण या विरोधात आंदोलनही करतील.
एक हजारी    - हो ना... अस तर होणारचं
अर्ध हजारी    - तुला तर माहीतच आहे, आमचा वापर कीती गलीच्छ पध्दतीने व्हायचा.
एक हजारी    - हो तर...
अर्ध हजारी    - काहींनी तर आमच्याच सेम टू सेम कॉपी करुन या बाजारात आणल्या आणि आम्हा खऱ्यांची कींमतच कमी केली.
एक हजारी    - हो गं... अश्याने तर कष्टाने कमवणारे लोकही आम्हाला स्विकारत नव्हते.
अर्ध हजारी    - हो ना, शंभरवेळा तरी पारखून निरखून बघायचे. शिवाय आमचा सिरियल नंबर देखील नोंद करुन ठेवायचे. आपल्या वरचा ना विश्वासच उडालेला बघ.
एक हजारी    - सुटलो बाई... सुटलो एकदाचे
अर्ध हजारी    - आता ती दोन हजाराची महाराणी आली आहे.
एक हजारी    - हो समजलं. तिने तर आल्या आल्याच रंग दाखवायला सुरुवात केली.
अर्ध हजारी    - हीहीही... आपण मेली एवढी वर्षे आहोत पण कधी असा रंग बदलला नाही.
एक हजारी    - हो ना... आणि वर म्हणते माझी कॉपी कोणीच करु शकत नाही.
अर्ध हजारी    - अगं तिने हा जग पाहीलाय कुठे? आत्ताच तर आली आहे. थोडे दिवस जाऊ दे, तिला तेही समजणार, या दुनियेतील लोक कीती महाभाग आहेत ते.
एक हजारी    - हीहीही... तेव्हा मात्र तिचा पुरता रंग उडालेला असेल.
अर्ध हजारी    - चल गं... आमच्या मेदीकाकांची मुलाखत संपली. उध्या सकाळपासून बँकेतच भेटू.
एक हजारी    - हो हो... मस्त एसीमध्ये बसूनच गप्पा मारु. बाय...
अर्ध हजारी    - बाय... गुड डिसीजन!!!


भरत वि. माळकर

Friday, December 2, 2016

हवाहवाई...

विमान निघाले आणि ते तांत्रिक बिघाडामुळे पडणार असे जाहीर होते...

फार फार तर आमचा प्रवास कोंकण-मुंबई-कोंकणजसा ‘पुणे-मुंबई-पुणे’. फरक एवढाचं कोंकण-मुंबई-कोंकण या नांवाने चित्रपट बनवायचा बाकी आहे.

असा हा आमचा कोंकणचा प्रवास गेली कित्येक वर्षे तोट्याची का असेना पण हक्काच्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या लाल डब्याच्या बसमधून बाय रोडने चालू आहे. अलीकडेच काहीवेळा तो झुकझुक आगगाडीतूनही होत असतो. आता मात्र या प्रवासाला आमचे होममिनिस्टर फार कंटाळून गेले होते. होममिनिस्टर का, मुख्यमंत्रीच म्हणा, सर्व महत्वाची खाती त्यांच्याकडेच, आमच्याकडे  फक्त सर्वसाधारण खाती.
तर अश्या या आमच्या होममिनिस्टरांच्या इच्छेखातर आणि प्रदीर्घ चर्चेअंती उड्डाण करायचं ठरलं. त्यांना हवाई वाहतूकीचा अनुभव घ्यायचा होता तर आम्हाला हवाई सुंदरीना जवळून न्याहाळायचं होतं. हे आमच्या मनातलं, आणि जरी का मोकळेपणाने तोंड उघडलं तरी आम्हा पुरुष्यांच्या मताला कीती कींमत असते...? तुम्हाला काय वेगळ सांगायची गरज नाही.
शेवटी दोन सिटचं बुकींग झालं तेही क्रेडीट कार्डव्दारे. आता या कार्डच बिल दिवाळी बोनस मधून भरायचं. तोपर्यंत हवा-हवाई समजून दर महीन्याला फक्त व्याज पे व्याज करत राहायचं. आपल्यासारख्या नोकरदारांचे आवाज फक्त दिवाळी बोनसपुरतेच मर्यादीत असतात.

शेवटी उड्डाण करायचा दिवस उजाडला अर्थातच विमान प्रवासाचा. सामानांच्या मोठ मोठ्या पाच बॅगा भरल्या, नेहमीप्रमाणे लाल डब्याच्या प्रवासाची सवय.

अहो, सर्व बॅगा व्यवस्थित पॅक केलात ना?” …बेडरुममधून आरश्यासमोर मेकअप चालू असतानाच एक दमदार आवाज दरवाज्याच्या फटीतून माझ्या छोट्याश्या कानावर येऊन आदळला.
हो केल्या... तू जरा लवकर तयार हो बघू .....मी आपल बोलायचं म्हणून बोललो.
हां झालं, तूम्हा मेल्या पुरुषांच बरं असतं, पिशवीत पाय घातलं की झालं. आम्हा मेल्या   स्रियानांच हे एवढ कराव लागतं...ठरलेलं उत्तर मिळालं
आता स्रियादेखील पिशवीत पाय घालतात म्हणे ...मी घाबरतच उत्तर दीलं
हो...हो माहीत आहे...कधी हौस म्हणून काही करायला दील का?”
नाही गं मला तसं काही म्हणायचं नव्हतं, तरीपण, ह्या पाचही बॅगा पॅक करुन झाल्या आणि मीही पॅक झालो तरीही तू पॅक होतेसच म्हणून म्हटलं. बाकी आपलं तस काही नाही. तुझं चालूदे”
हां बस्स झालं, चला निघूया. आणि हो माझ्या आई –पप्पांच सर्व सामान व्यवस्थित भरल ना, आणि माझ्या साड्या, ड्रेसत्यांना चूरगळ्या पडणार नाहीत अश्या लावल्यात ना
हो गं बाई, चला आता...

एका प्रदीर्घ वेळेनंतर आमच्या मॅडम कश्याबश्या बाहेर पडल्या. टॅक्सी पकडली आणि एअरपोर्टला जायला निघालो. एअरपोर्टमध्ये प्रवेश केल्या केल्या पहीली धाड या बॅगांवर. प्रवाशांसोबत ठराविकच किलोचे सामान घेता येत हे आम्हाला प्रथमच समजलं. आणि तिथूनच आमच्या होममिनिस्टरनी लाल डब्याशी तुलना करणे चालू केलं. आता सामान कमी करण्याची वेळ आली अर्थातच कमी कोणाचे होणार तर आपलंच. तीच्या माहेरच्या मेंबर्सच्या वस्तू कमी करणे आपल्या हातात नव्हतं. आपण बाहेर कीतीही सिंहाच्या डरकाळ्या फोडल्या किंवा शहाणपणा दाखविला तरी त्या एका स्त्रीशक्ती समोर आपण मांजरच असतो हे नव्याने सांगायला नको.

प्रत्यक्षात विमानात बसायची वेळ येते. आपल्या सीट न शोधता हवाई सुंदरी शोधण्यास माझ्या नजरा गरागरा फिरत होत्या तर होममिनिस्टर विमानाचा इंटीरिअर भाग पाहण्यात दंग होत्या. शेवटी आसन पादांकृत केल्यानंतर हवाई सुंदरीच्या मदतीने सीट बेल्ट लावून घेतल्या. काही वेळानंतर इंग्लीशमधून इंस्ट्रक्शन येऊ लागली.

“Ladies and gentlemen, the captain has turned on the Fasten Seat Belt Sign. We request that all mobile phones, papers…..”

अश्या बऱ्याच इंस्ट्रक्शन आमच्या डोक्यावरुन जात होत्या. आमचे होममिनिस्टर तर शुन्यातच पाहत होत्या.
काही वेळातच Take-off घेण्यात आला होता. हवाई वाहतुकीचा सुखद अनुभव घेत घेत आम्ही तोता-मैना सारखे आकाशात भरारी घेत होतो. आम्हा उभयतांच्या चहऱ्यावर खुशीकी लहरे उमटत होती. साधारणता १०-१५ मिनिटांचा खेळ होतो न होतो तोच एक सुचना आली.

विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते कोसळण्याची शक्यता आहे. तरीही आमचे टेक्नीशीयनस् धोका टाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहेत

पूर्ण विमानात “O My God” असा आवाज येवून आराडा ओरड चालू झाली. आमचे होममिनिस्टर मात्र शांतच होते. कारण ती सूचना इंग्लीश मधून असल्यामुळे त्यांना काही समजलचं नाही आणि आम्हांला काही उमगलं नाही. मात्र ज्यावेळी आम्हाला हे समजलं त्यावेळी मेलो मेलोओरडत बांधलेला बेल्ट तोडून माझ्यासहीत आम्ही सीटवरच उभे राहीलो.
सर्वजण विमान कोसळू नहे म्हणून चर्चा करत होते, देवाचा धावा करत होते. तर आम्ही उभयतांच हवाई वाहतूक करण्यास कोण कसे जबाबदार आहे यावरुन जोरदार भांडण चालू झाल, तेही सीटवरचं उभ राहून.
मला तर कधी नव्हे तो मुद्दाच सापडलेला. एवढं असूनही माझा विजय होईल याची शाश्वती नव्हतीच. तरीही मी काही मुद्दे रेटून धरण्याचे ठरवले.

तरी तुला मी सांगत होतो रेल्वेने जाऊ, नाहीतर आपली हक्काची लाल डब्याची बस तर आहेच. पण नाही तुलाच या हवाई प्रवासाचा नाद होता, आता चला ढगात. इथून आकाशही चार हातावर आहे कमी खर्चात वर पोचवू
हो-हो मलाच बोला, नेहमी मलाच घालून पाडून बोलत असतात. आणि तुमचं काय, विमानात आल्यापासून बघतेयं तुमचा लक्ष फक्त त्या नर्तिका बघण्यातच आहे.
हो-हो, तू विषय बदलू नकोस... कधी स्वत:ची चूक कबूल केलीस? नाही.
यात माझी कसली चूक आली? मला काय स्वप्न पडलेलं, हे असं होणार ते?”

असं हे आमचं भांडण जवळपास ४०-४५ मिनीटे न थांबताच चालू होतं. फक्त मारामारी करायची बाकी होती. शेवटी नेहमीप्रमाणे मलाच माघार घ्यावी लागली. मी गप्प झालो तरीही होममिनिस्टरांचा पट्टा चालूच होता. मी भानावर आलो, बघतो तर काय विमानातील इतर सर्व प्रवासी शांत आपापल्या सिटवर बसून आमच्या तमाशाचा आनंद लूटत होते. मी तीला थांबवलं. आम्हाला अशा अवतारामध्ये पाहून सर्व प्रवासी खो-खो हसायला लागले आणि म्हणाले अहो मिस्टर अँण्ड मिसेस्... आपल्यावरील संकट टळलयं आणि आपण सुखरुप गोव्याला पोहचलो

तेवढ्यातच, “Ladies and Gentlemen, Welcome to Goa airport…!” अस काहीस कानावर पडलं आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.

मात्र यापुढे हवाई वाहतुक नाही, यावर आम्हा उभयतांचा शिक्कामोहर्त झाला.



- भरत माळकर, मुंबई


Monday, October 3, 2016

प्रेम –एक चिरंतर सत्य


प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमच आमचं सेम असतं... अशा कविता, शब्दरचना आपण नेहमीच वाचत, लिहीत असतो. परंतु खरचं हे प्रेम सेम असतं? म्हटलं तर असतं... म्हटलं तर नसतं... प्रत्येकाच्या आयुष्यातील हे प्रेम वेगवेगळ्या रुपाने समोर येत असतं. प्रेमाची भाषा, भावना, रंग, रुप, ओढ नक्कीच भिन्न भिन्न असते. आयुष्यात कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाला या-ना-त्या नात्यातून प्रेम भेटत जातयं. आपणही प्रत्येकजण वेगवेगळ्या अंगाने ते अनुभवत असतो. शिवाय प्रेम या दोन शब्दामुळेच तर विश्वातील प्रत्येक घटकाला उत्साही जीवन जगण्यासाठी टॉनिक मिळत असतं.

मला वाटतं प्रेम हे दोन नात्यातील अतूट बंधन, आपुलकी, ऐकमेकांच्या चुकांवर पांघरुण घालणारं, कर्तृत्वाला प्रोत्साहीत करणार, तर कधी रागावणार आणि सुख:दुख: मध्ये वाटेकरी बनणार असं हे अतूट नांत म्हणजेच प्रेम. मग त्यात मानव नात्यातील कुटलेही दोन कींवा त्याहीपेक्षा जास्त घटक असू शकतील. स्री-पुरुष, पुरुष-पुरुष किंवा स्री-स्री या मानवरुपी प्रेमासोबतच आपण प्राणी, पक्षी यासारख्या सजीव घटकांमध्येही प्रेम पाहत असतो. इथपर्यंतच नाही तर ते देशप्रेमही असू शकत.

प्रेम म्हटलं की सर्रास चित्र उभ राहतं किंवा ते आपसुक आपल्या नजरेसमोर येतं ते दोन तरुण तरुणींमधील प्रेम. पण नाही, ह्या प्रेमाचा प्रवास चोहोबाजूला पसरलेला आहे. आपण थोडतरी खरचटलो तरी काळजीने व्याकूळ होणारी, स्वत:च्या जीवापलीकडे जपणारी आपली आई म्हणजे प्रेम.
स्वत: पायात फाटकी चप्पल घालून दगड-धोंड्यामध्ये चालणारे, शेतात राबणारे, मात्र मुलांसाठी नवीकोरी चप्पल घेऊन देणारे आपले बाबा म्हणजे प्रेम.
कीतीही मस्ती केली आणि रात्री उशीर झाला तरी कोणालाही चाहूल न लागता दरवाजा उघडणारे आपले आजी-आजोबा म्हणजे प्रेम.
कीतीही वाद झाला तरी दादा जेवलास का? अशी विचारणारी बहीण म्हणजे प्रेम.
आपला पगार कमी असला तरीही भाऊबीजच्या दिवशी तीच्या आवडीचा ड्रेस घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.
घरातील सर्वांची काळजी घेणारी मात्र स्वत:ची काळजी न घेता नवऱ्याला हवं नको ते डोळ्यात तेल घालून तत्पर असणारी आपली बायको म्हणजे प्रेम.

यासारखी समाजातील अनेक प्रेमाची नाती रुबाबदारपणे नांदत आहेत. प्रेमाच्या नात्यांमध्ये कीतीही चढ उतार येऊ दे, आप-आपसात कडवटपणा, वादविवाद असला तरीही आयुष्याच्या अंतापर्यंत हे प्रेम टिकून असतं. आपली माणसं आपलं प्रेम अश्या रक्ताच्या नात्यातील असो वा अन्य कोणत्याही नात्यांच्या ऋणानुबंधातून निर्माण झालेलं, गुंतुन राहीलेलं हे प्रेम असो. अशा या विविध नात्यातून निर्माण झालेल्या प्रेमातील एक सर्व परिचीत प्रेम म्हणजेच दोन तरुण तरुणींच प्रेम. ज्याला समाज प्रेम कहानी म्हणून ओळखतो. बऱ्याचअंशी अशा प्रेमाला माणूस स्वत:चं ते प्रेम आणि दुसऱ्याचं ते लफडं याच शब्दांनी संबोधित असतो. आयुष्यातील गुलाबी दिवस कधीही संपू नहेत असे हे दिवस. हे दिवस तारुण्याच्या उंबरठ्यावर खूपच उफाळून येतात. सोळावं वरीस धोक्याचं गं.... सोळावं वरीस धोक्याचं या लावणीप्रमाणे खरंच हे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यातील धोकादायक वळणावरचं असतं. नेमक बालपणही नसतं आणि तारुण्यही नसतं. मनातील व्दिदास्थिती याच वयात जास्त विस्फोटक असते. सगळं काही हिरवं हिरवं दिसत असतं. प्रेम म्हणजे फक्त दोन तरुण तरुणीतीलच ओढ, आकर्षण, सौंदर्य इथपर्यंतच त्यांच्या दृष्टीने या प्रेमाची व्याख्या असते. त्यामुळे बरेच तरुण तरुणी काळाच्या ओघाबरोबर चुकीच्या जाळ्यात अडकून जातात. परंतु हा काळ निघून गेल्यावर त्यांना हे प्रेम म्हणजे या दोन घटकांपुरतच मर्यादित नाही आहे तर विश्वातील त्याचा विस्तार, वावर मोठा आहे याची जाणीव होते.

तरुणाईच्या प्रेमाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मकरित्या बदलत चाललेला असाला तरीही समाज अश्या प्रेमाला अध्यापही मोकळेपणाने स्विकारायला तयार नाही आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. बऱ्याचवेळी एकतर्फी प्रेमातून घडत असलेल्या घटनांचे दुष्परीणामही तेवढ्याच घातकरित्या भोगावे लागतात. काहीवेळा जाती-पातीच्या नावांखाली समाजही आड येत असतो. अशा वेळी गुलाबी दिवसातील हे प्रेम शब्द हत्यार होऊन आपल्यावरच चाल करतात.

चिरंतर प्रेम हे सुंदरतेवर अवलंबून नसतं तर ते मानसिकतेवर, वैचारिकत्येवर अवलंबून असते. मनाने स्वच्छ असणारी कोणतीही व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर साथ देणार कारण त्या व्यक्तीला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा गरज असते ती फक्त तुमची आणि तुमचीच. प्रेम आजही जिवंत आहे आणि भविष्यातही असणार आहे. दुनियेमध्ये कितीही उलथापालथ होवो प्रेम मात्र अबाधित राहणार आहे हे चिरंतर सत्य आहे. कारण प्रेमाला भाषा नसते, प्रेम हे आंधळ असतं, ते जात-पात, गरीब-श्रीमंती असा भेदभाव मानत नाही.

अशाच या प्रेमासंदर्भातील वाचनात आलेल्या दोन ओळी आपणासमोर शेअर करायला नक्कीच आवडतील.

काही अनोळखी हळू-हळू ओळखीचे होऊ लागतात
आपल्याला मग आपल्यापेक्षाही प्रिय वाटू लागतात...

तर काही वेळा हेच प्रेम आकलनशक्तीच्या पलीकडेही असतं. अश्यावेळी खालील ओळी देखील शब्दांच्या पलिकडे जाऊन विचार करायला भाग पाडतात.

प्रेम म्हणजे हा एक मोठा प्रश्न
काहीजण आयुष्यभर सोडवतात
काहीजण सहजतेने सोडवतात
तर काहीजण आयूष्य सोडून सोडवतात.


पहायला गेल्यास प्रेम हे करायला आणि टिकवून ठेवायला फारच कठीण असतं तरीही आयुष्यातील ती एक अत्यावश्यक गोष्ट आहे. माणसाच्या प्रत्येक श्वासासोबत प्रेमाच्या लहरी तरंगत असतात. इतिहासही याला साक्ष आहे. मग त्या रामायण महाभारतातील अजरामर प्रेमकथा असोत, देवादिखांच्या कथा असोत कींवा तुमच्या आमच्यातील कुटल्याही नात्यातील प्रेम असोत. या सर्व घटना यापुढेही साक्ष राहतील आणि प्रेम -एक चिरंतर सत्य असल्याचे समाज अनुभवत राहील.


- भरत माळकर

Tuesday, September 6, 2016

सुपारी

संध्याकाळचे ५ वाजले होते. साधारणता ४ फुट उंच, मध्यम बांधा, फुल पँट, हाफ हाताचं शर्ट, केसांवर कंगवा फिरवत, ढोलासारखे पोट पुढे घेऊन आमचा रघु धावत धावत मदनच्या घरी जाताना दिसला. मीही त्याची नजर चूकवत त्याच्या मागोमाग गेलो. बघतो तर काय, कोणीतरी झोपलं होतं त्याला खडबडून उठवलं.

काकांनू तुम्ही काय! माका वाटला मदन झोपलो हां" रघु घाबरत घाबरत बोलू लागला.
"फटकी भरली तुझ्या तोंडार मेल्या माझो आत्ताच खय डोळो लागलेलो. आधी बघ तरी कोण हा तो" कांकानी ठेवनीतल्या शिव्या झाडल्या.
"चुकान झाला ओ, माका वाटला मदन, तुम्ही झोपा बघू आणि मदन खया?"
"मदन, तो बघ भुतूरल्या खोलयेत झोपलो हां." अस म्हणत काका परत झोपी गेले.
ये मदन, पाच वाजले तरी तीया झोपलसंचमेल्या येळ काय ठरलेली, चाराक जमाचा होता तरी एका कोणाचो पत्तो नाय म्हणांन तुमका बघुक वर इलय” रघु मदनला चांगलाच झापत होता.
आता मात्र माझी ट्युब पेटली होती. काल रात्री ठरल्याप्रमाणे मंडळी जमली नव्हती म्हणूनच हा रघु एवढा रागवत होता. हा सर्व प्रकार पाहून मी त्याच्या समोर जाण्याची हींमतच केली नाही.
"होय रे मीया साडेतीनचो अलाराम लायललय, पण तो वाजाकच नाय, थयच ह्यो सगळो घोळ झालो." मदनने डोळे चोळत चोळत उत्तर दिले.
"मराक व्हयेत अलाराम, तीया मेल्या मेन माणूस मरे, तीयाच असा केलस तर बाकी मंडळींका काय बोलतलसं. चल आता, पटकन तोंडार शीरा मार आणि खायल्यांच्या घराकडे ये. मीया ह्या मधल्यांका जागयतय." रघु तोंडाची पट्टी चालवल्यागत बोलत होता आणि मदन झोपेच्या नांवाने दगड फोडत होता. 
"तुमचा काय नाय रे, सुपारी मीया घेतलयं, येळात नाय गेलव तर तो सरपंच माका काय ठेवचो नाय." अस म्हणत हा आमचा रघु इतर मंडळींची तयारी झाली की नाही हे पहायला निघतो. वाडीतील सर्व  मंडळींना आवाज देत कसे-बसे सहा वाजता नियोजीत स्थळी जमतात आणि सरपंचांच्या घरी जायला निघतात.

वाचकहो, वरील सर्व संवादावरुन तुम्हाला समजलच असणार हे काय ते.
बरोब्बर....“ ह्या आमच्या तळकोंकणातला गणपती भजन मंडळ" चतुर्थीत आमच्या कोंकणात भजनांच्या सुपाऱ्यांचा पाऊस आणि त्यानंतर असणारी ही अशीच घाई-गडबड असते. हा मदन म्हणजे आमचा पेटीवाला बुवा तर रघु म्हणजे आमचा तबलजी, ठरविलेल्या वेळेत हजर राहणारा एकमेव हौशी कलाकार.

श्रावण महीन्यापासून आपल्या हींदू धर्मात विशेषत: महाराष्ट्रात विविध सणांना प्रारंभ होतो. गटारी अमावस्याच्या नावांने तळीराम आपली गटारी साजरी करतात आणि पुढचा एक महीना गणपती विसर्जना पर्यंत श्रावण पाळतात. श्रावणात मांसहारी चालत नाही परंतु मद्य प्राशाण केलेलं चालते असा गोड समज अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात रुढ होताना दिसत आहे. श्रावणातील नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि त्यानंतर येणारा आपल्या सर्वाचा लाडका सण म्हणजेच श्रीगणेश चतुर्थी’.

उर्वरीत भाग लवकरच....

Friday, August 12, 2016

अवयवदान काळाची गरज

ORGAN DONATION...

अवयवदान एक महादान, अवयवदान हे एक सर्वश्रेष्ठ दानअसे संवाद आपण जाहीरातीतून ऐकत, वाचत असतो. परंतु अद्यापही याकडे डोळस नजरेतून किंवा सामाजिक जाणीवेतून पाहण्याचा दृष्टीकोन हवा तेवढा आलेला नाही. इतर देशांच्या तूलनेत भारत याबाबतीत खूपच पिछाडीवर आहे अस सर्रास आपल्याला वाचायला मिळते. हे काहीस खरं असलं तरीही मागील काही महीन्यात हा आलेख उंचावलेलाही वाचनात येतं. १३ ऑगस्ट हा अवयवदान दिन साजरा करत असताना ही बाब आपल्या देशासाठी नक्कीच आशावादी आहे.

जन्माला आला त्याचा अंत अटळ आहे हे सर्वज्ञात आहे. प्रत्येक सजीवाच्या जीवन क्रमातील तो एक शेवटचा टप्पा आहे. वैध्यक तंत्रज्ञान कीतीही पुढ गेलं तरी हा टप्पा लांबवू शकतो परंतु तो थांबवू शकत नाही. शरीर हे क्षणभंगूर आहे. मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयवदान केल्याने अवयवरुपी जिवंत राहू शकतो हा विचार नागरिकांमध्ये रुजणे आवश्यक आहे. त्यासाठी अवयव दानाचे महत्व तळागाळापर्यंत पटवून देण्याच काम मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहीजे.

माणसाच्या शरीरातील अवयव रिकामी झाला की पेशंटच्या आयुष्याची खात्री देता येत नाही हा समजही मागे पडला. गेल्या दोन दशकांत वैध्यक तंत्रज्ञान, औषध निर्माण क्षेत्राने उत्तुंग झेप घेतली आहे. नव्या प्रतिजैविकांच्या शोधासह, दुर्धर व्याधींशी लढताना कराव्या लागणाऱ्या तपासण्यांपासून रोबोटिक शस्रक्रियांपर्यंत अनेक वैध्यकिय बाबींमध्ये सफाईदारपणा आला आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये आजाराशी लढण्याची ताकद आणि विश्वास निर्माण झाला आहे.

किडनी, डोळे, त्वचा, मुत्रपिंडे, यकृत, फुफ्फुस दानाविषयी समाजामध्ये जागृती होत असली तरी अध्यापही ह्रदय दानाविषयी समाजामध्ये म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. ह्रदय दिले तर मोक्ष मिळत नाही अशी एक अंधश्रध्दाही ह्रदयाचे दान करण्याच्या निर्णयापासून कुटुंबाला परावृत्त करते. नागरीकांनी अंधश्रध्देच्या आहारी न जाता वास्तवाचे भान ठेवून खऱ्या अर्थाने अवयव दानाचे काम करणे महत्वाचे आहे. याबाबत सर्वदूर जागृती नागरीकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे.

मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरु शकतो. तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारु शकतो. अवयव दान दोन प्रकारे केले जाते. एक लाईव डोनेशन (जिवंतपणी) तर दुसरे ब्रेनडेड (मृत्यूपश्चात). ब्रेनडेड अवस्थेतील व्यक्तींचा मृत्यू अटळ असल्याचे डॉक्टर सांगतात ती परिस्थिती नातेवाईकांसाठी खुपच बिकट असते. तरीही ब्रेनडेड शरीरातील अवयव वाया जायला नकोत आणि दुसऱ्या एकाचे आयुष्य वाढणार आहे हा चांगुलपणा दाखवून त्यावेळच्या परिस्थितीला सामोरे जायला पाहीजे. अवयव दान करणारा हा कधीही श्रेष्ठच असतो. परंतु पेशन्ट ब्रेनडेड सारख्या अवस्थेत असताना जेव्हा त्यांचे कुटुंब अवयव दानाचा निर्णय घेतात तेव्हा ते कुटुंब त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते. कारण हा निर्णय बहुतांशी सामुदायिक असतो आणि सामुदायिक निर्णयावर लवकरात लवकर एकमत होणे कठीण असतं.

दिनांक ३ ऑगस्ट २०१५ रोजी मुंबईमध्ये ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रीया यशस्वी झाली. साधारणता ४० वर्षातील मुंबईच्या इतिहासातील पहिली यशस्वी ह्रदयरोग शस्त्रक्रिया पार पडली. कवटीतील अंतर्गत रक्तस्रावामुळे असाध्य ह्रदयरोगाचा सामना करीत असलेल्या व मुंबईत उपचार घेत असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला पुण्यातील ४२ वर्षीय ब्रेनडेड महिलेच्या ह्रदयाने जगण्याची नवी उभारी दिली. डॉक्टरी कौशल्य, यंत्रणांचा समन्वय, समाजातील चांगुलपणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दात्यांच्या कुटुंबाच्या दूरदूष्टीपणामुळे हे शक्य झालं. चार तासाच्या अवधीमध्ये ह्रदयाचे प्रत्यारोपण होणे आवश्यक असताना इकडे पुणे आणि मुंबई या रस्त्यामार्गे किमान चार-पाच तासांचे अंतर असलेल्या दोन शहरांमध्ये या धडधडत्या ह्रदयाला विध्युतवेगाने पोहचवणे वाहतूक यंत्रणासमोर अग्निपरीक्षाच होती. या अग्निपरीक्षेत उतरुण पुण्याच्या जहांगिर हॉस्पिटलपासून मुलुंडच्या फोर्टीस हॉस्पिटलपर्यंत हवाई व स्थानिक रस्ते मार्गाने ठिक तासभरात हे ह्रदय योग्य नियोजनाव्दारे आणले गेले आणि यशस्वी ह्रदयरोपण शस्रक्रीया पार पडली.

त्याच दरम्यान आणखी एका चेंबूरच्या अणुशक्ती नगरमधील ब्रेनडेड वैज्ञानिकांच्या नातेवाईकांनी ह्रदयदानाबरोबर दोन्ही किडनी, लिव्हर, दोन्ही डोळे आणि स्वादूपिंडाचे दान करुन नवा सामाजिक दृष्टीकोन रुजवला आहे. या ब्रेनडेड पेशंटने किमान चार जणांना नवे जीवन आणि दोघांना दृष्टी दिली हे एक अनोखे अवयवदान आहे. अशा प्रकारची नागरीकांमध्ये जागृती निर्माण व्हायला पाहीजे आणि अशा उदाहरणाने यापुढे ती नक्कीच निर्माण होणार आणि ती होतानाही दिसत आहे.

आपण अवयवदानामध्ये मागे राहत असल्याच्या काही कारणांपैकी, हॉस्पीटलमधील समन्वयाचा अभाव आणि अवयवदानाविषयी उदासीनता ही या प्रक्रियेतला सर्वात मोठा अडसर आहे. खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमधील समन्वय नसल्यामुळे दाता आणि पेशंन्ट यांना त्यासंदर्भात पुरेशी कल्पना येत नाही आणि योग्य प्रचार, प्रसार नसल्यामुळे नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी उदासीनता असते. त्यामुळे हॉस्पीटलमधील समन्वय आणि अवयव दानाचा प्रचार आणि योग्य ती माहीती पुरवून नागरीकांना स्वच्छेने अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे काम जोमाने व्हायला पाहीजे.

अवयवदान चळवळ मोहीमेत स्वयंसेवी संस्थामुळे अलिकडे व्यापक जनजागृती होत आहे. अवयवदानाच्या जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांच्यावतीने ६ ते १३ ऑगस्ट या काळात अवयवदान सप्ताह पाळण्यात येतो. मुंबई महापालिकेने म्युनिसिपल ऑर्गन ट्रान्सप्लान्ट ऑर्गनायझेशन (मोटो) या नावाने केंद्र सुरु केले आहे. त्याचप्रमाणे या चळवळीत झोनल ट्रान्सप्लास्ट कोऑर्डिनेशन सेंटरची (झेडटीसीसी) भूमिका मोलाची ठरताना दिसत आहे. यासाराखी केंद्रे, संस्था जोमाने काम करत आहेत. अवयवदानासाठी मृतांच्या नातेवाईकांचे कौन्सिलिंग करणे, ब्रेनडेड पेशंटचा शोध घेणे, त्यांची माहीती ठेवणे अशी कामे या केंद्रामार्फत करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

या सर्वांबरोबरच राज्य सरकारकडून अवयव प्रत्यारोपणासंदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती करणे गरजेचे आहे. मागील वर्षी मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ह्रदय प्रत्यारोपणाची मुंबईतील पहिली यशस्वी शस्रक्रीया पार पडली. त्यावेळी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी त्या पेशंट आणि डॉक्टरांची भेट घेतली त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अवयव प्रत्यारोपणासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात सर्व माध्यमांतून जाणीव, जागृती करणार, रस्त्यावरील वाहतुकींची अडचण लक्षात घेता अँम्ब्युलन्ससाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था (ग्रीन कॉरिडॉर) करण्याचा विचार आहे. तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत मुत्रपिंड प्रत्यारोपण केलेल्या पेशंटबरोबरच दात्यांच्या मदतीचाही विचार केला जाईल अशा गोष्टींचा उल्लेख केला होता. यासारख्या योजनांचा पाठपुरावा करुन त्या प्रत्यक्ष अंमलात आणणे अत्यावश्यक आहे. तरच या अवयवदानाला चालना मिळेल आणि आश्वासनांनाही महत्व प्राप्त होईल.

तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य आहे हे आपण नेहमीच म्हणत असतो त्यामुळे या तारुण्यांतच अशा प्रकारचे शिक्षण मिळाल्यास त्यांना या गोष्टींची सवय होईल आणि पुढील कामे सोपी होतील. म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश करुन अवयवदानाचे धडे देवून त्याचे महत्वही अधोरेखित व्हायला हवेत. शाळा, कॉलेजांतून यासंदर्भात चर्चासत्र, परिसंवादही व्हायला हवेत.

भारतातील नागरीकांचा अवयव दानाकडे पाहण्याचा रोख निश्चितच बदलत आहे तो अजूनही आश्वासकरित्या बदलायला हवा आणि हे बदलण्यासाठी वरील काही उपायांसहीत सामाजिक दातृत्वाचीही गरज आहे याचे भान ठेवून अवयवदानामध्ये नागरिकांनी पुढाकार घेतल्यास आत्ता दिसत असलेले चित्र अधिकच सुंदर होण्यास वेळ लागणार नाही.

- भरत माळकर

Saturday, July 16, 2016

चिकलवणी (चिखलवणी)

सरीवर सरी कोसळत होत्या.... काळ्याकुट्ट ढगांनी सूर्यकिरणांना झाकूण टाकल होतं. सकाळचे दहा वाजून गेले होते तरीही आत्ताच सुर्य झोपेतून जागवतो की काय असचं काहीसं भासत होतं. नेहमीच गजबजलेल्या आणि घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबई शहरातील रेलचेल थोडीशी मंदावलेली दिसत होती. तर कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजामुळे माणसांच्या बोलण्याचा आवाज, गाडींचे हॉर्न, ट्रेनच धडधडनं, विमानांच रो-रोन... असे नैसर्गिक - अनैसर्गिक सर्वच ध्वनी काही प्रमाणात लुप्त पावले होते.

आज वारही चांगला होता, अर्थातच आपल्या नोकरदार वर्गाचा रविवार असल्यामुळे सगळं कसं आरामात चाललेल. मी गरमा गरम चहाचा आस्वाद घेत मुंबईतील आमच्या दहा बाय दहा च्या प्रशस्त खोलीतील गच्चीतून समोरील दोन खोलीतील छोट्याश्या गॅपमधून मुसळधार पावसाचं ते विशाल दृश्य बघत मनसोक्त कोसळणाऱ्या पावसाच्या रमणीय धुंदीत गुंग होऊन गेलो होतो... दरम्यान ही गुंगी मला एवढी चढली की, माझे हे मन मुंबई शहरातून थेट तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या साळगांव गांवी जावून कधी त्या धो-धो कोसळणाऱ्या पावसामध्ये मनसोक्त भिजू लागल होत, त्याचा मला थांगपत्ताच लागला नाही. गीतकार गुरु ठाकूर यांच्या मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे.... या गाण्याचा नेमका प्रत्यय मला आज आला होता.

अशाच या पावसाळ्यात आपल्या सिंधुदुर्गकरांची भात पेरणीपासून चालू झालेली धांदल, लगबग, त्यातील संवाद आणि बरचं काहीस... चिकलवणी, लावणीपर्यंत कसं मजेशीर असतं त्याचा माझ्या, तुमच्यासारख्या सिंधुदुर्गकरांनी अनुभवलेला, प्रत्यक्ष साकारलेल्या तमाम मनांना खुणावत असलेली ती दृश्ये रेखाटताना अक्षरश: त्या लावणीत मी चिकलावून गेलो होतो. पावसाळ्यातील भात शेतीच्या कामांच उभ चित्रच माझ्या डोळ्यांसमोर थैमान घालत होतं. माझ्यासोबत तूम्हीही त्या चिखलात माखून जाल हे नक्की.

जून महिन्यातील ७ तारीख होती. आमच्या मालवणी भाषेत सांगायचचं झाल तर, त्या दिवशी मिरग होतो. पावसाची मुहुर्तमेढ त्या दिवसापासून रोवली जात असल्याचा समज पूर्वापार चालत आलेला आहे. संध्याकाळचे ५ वाजले होते.... आमचे शेजारी सखाराम काका बाहेर फेरफटका मारायला निघालेले.

ये दाजी, पावस बरो पडलो नाय रे. सखाराम काका (सखो) एका-एका शेजाऱ्यांची घर घेत दाजीना आवाज देतो.
आणखी तासभर तरी मेल्याच्या तोंडार वशाडी पडाक व्हई व्हती. दाजी ठरलेलं वाक्य सखाऱामाच्या तोंडावर फेकतो.
मेल्या काय, इतको पडलो तरी खूप हां बा
काय खूप हां, ह्या पावसानं जमीन तरी पोकारतली? रात्री एखादी मोठी सर ईली तर मात्र बरी जमीन भिजतली
(सखाराम आकाशाकडे बघत...) आभाळ तर धरुन हां, बघया काय करता तो. चल येतय
बस रे जाशीत
नाय रे, सोनक्या सुताराकडे जावनं येतय, नागर पदराक नाया, तीया आपलो सगळी तयारी करुन बसलसं
मेल्या तुझे कोणी हात धरलेले. मे म्हयन्यात तीया लग्नाचे वडे खावक पडलेलस... त्या वड्यांपुढे तुका काय सुचाच नाय व्हता दाजीनी सखाराम काकांच्या नेमक्या मुद्द्याला हात घातला.... बिचारे सखाराम काका जायला निघतात.

पहिल्या पावसानंतर नाक्या- नाक्यांवर, शेजारी-पाजारी अश्या संवादांची मेजवानी आमच्या मालवणी कोकणात सर्रास चाखायला मिळते. सख्याने म्हटल्याप्रमाणे रात्री चांगलाच पाऊस बरसतो. आजपासून पावसाळी शेतीच्या कामांना सुरुवात करण्याच्या इराद्याने आमचे शेतकरी बांधव पहाटे पाच-साडेपाचच्याच ठोक्याला उठून जोत घेऊन जायच्या तयारीला लागतो. घरातील मोठी व्यक्ती घाईगडबडीने चहा पित जोतासाठी लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करु लागतो. घरातील इतर मंडळींना उठवत तो हे सर्व करत असतो.

बंड्या, चल उठ, दिवस बघ किती वर इलो हां असं म्हणत सखाराम काका आपल्या मुलाच्या  अंगावरची गोडदी ओढतात.
थांब रे बाबा, थोडो येळ झोपतयं
मेल्या झोपतय काय, त्या चंद्याचो पोर बघ इतक्यात तेचो येक कोपरो धरुन झालो असतोलो. तिया रात्री अर्धे रात्री मिरवान मिरवान येतस आणि सकाळी दिवस डोक्यार इलो तरी ढेंगा वर करुन टांगून देतसं बाबांनी नेमकी संधी साधली. 
बंड्या उठतो, तोंड धुवून चहा पित असतानाच गुरांच्या गोठ्यातून पुन्हा आवाज येतो.
बंड्या झाला काय रे
व्हय व्हय येतयं
ह्या बघ, मीया बैलांका आणि जू घेवन जातय. तीया ह्यो नांगर आणि कुदळ घेवन मधल्या शेतात येत्याचे बाबा त्याला सांगतात.
तुम्ही जाया ओ, तो बरोब्बर येतलो. उगाच त्याच्यापाटी कटकट नको मध्येच स्वयंपाक घरातून शेतकऱ्याच्या बायकोचा आवाज येतो.
व्हय गो, तिया गप रवं, तुझ्यामुळेच तो शेफारलो हा. कधी काय सांगूक गेलय काय तीया तेची बाजू घेतस असं दबक्या आवाजात बोलत बिचारे सखाराम काका बैलांना घेऊन शेतावर जायला निघतात.

हा आमचा शेतकरी कित्येक दिवसानंतर बैलांना जोतासाठी जुंपणार असतो त्यामुळे त्याचे बैल थोडेशे सैरभैर पळतात. त्याचे बैल म्हणजे त्याच्यासाठी सर्जा-राजाचीच जोडी असते. या सर्जा-राजांना बरेच दिवस जोताची सवय नसल्यामुळे सुरुवातीला ते खुपच वेडे-वाकडे घेत असतात. तरीही आमचा हा शेतकरी त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवत, सर्जा-राजा हाक मारत जोतासाठी जुंपतो आणि नांगर घेऊन येणाऱ्या बंड्याच्या वाटेवर नजर लावून बसतो. दहा-पंधरा मिनिटे झाली तरी हा बंड्या काही येत नाही. शेवटी वैतागुन सखाराम काका कुकारा (मोठ्याने ओरडणे) देतो. सोबत प्रेमाने चार शिव्याही झाडतो. तेवढ्यातच बंड्या त्याच्या नजरेस पडतो.

मेल्या पाय उचल, दिस बघ डोक्यार इलो हां
बंड्या थोडासा जोरात चालल्यासारखा करतो. ते त्याच्याकडून नांगर घेतात, जुवाला बांधतात आणि जोत हाकायला सुरुवात करतात.
हीरी हीरी.... फाफारी....
भायर खय ओढतस....भूतूर ये.... सामको चलं....
पावलार ये....

अशा या ठरलेल्या मालवणी शब्दांचा वापर करत आमचा शेतकरी जोत हाकवीत असतो. आमच्या या जोताच्या गुरांना ही भाषा उत्तमरित्या अवगत झालेली असते. पहील्या पावसानंतरची ही पहीलीच नांगरणी असल्यामुळे नांगर धरायला कठीण येत असतं. हात दुखत असतात, बैलांना नांगर ओढायलाही त्रास होत असतो. यालाच फोडणी असे म्हणतात. फोडणी, दुडणी आणि त्यानंतर गुटा घालून जमिनीची मशागत करुन भात पेरणी केली जाते. या भात पेरणीला गुट्याखाली पेरलयं असही संबोधले जाते.
फोडणी, त्यानंतर दुडणी (जमिनीची उभी-आडवी मशागत) करुन झाल्यानंतर आता गुटा (जमिनीवर फिरवायची लाकडी फळी) फिरवायची वेळ येते. आपल्या पन्नास टक्के शेतकऱ्यांजवळ गुटा नावाचे अवजार नसतच. आणि ज्यांच्याजवळ असेल ते सुस्थितीत असेलच याची शक्यता खुपच कमी असते. दुडणीची नांगरणी संपायला काही अवधी असतानाच सखाराम काका बंड्याला हाक मारतात.

बंड्या.... ये बंड्या. बंड्या काहीच प्रतिउत्तर देत नाही. तो तिकडे इतर मुलांसोबत खेळत असतो. सखाराम काका जोत उभं करतात आणि आपल्या प्रेमळ भाषेत बंड्याला आवाज देतात.
मेल्या बंड्या, तुझे कान फुटले काय रे? हडे ये तेव्हा कुठे तो बंड्या धावत येतो.
काय झाला? कीत्याक आरडतसं बंड्याही तेवढ्याच प्रेमळ पध्दतीने प्रतिउत्तर देतो.
अरे, त्या परश्याच्या जोतार गुटो असलो तो घेवन ये

बंड्या गुटा आणायला जातो खरा परंतु त्या परश्यालाही गुटा घालायचा असल्यामुळे तो तिथेच पंधरा मिनटे थांबतो. इकडे हे काका नांगर सोडून गुट्याची वाट बघत बसतात. तेवढ्यातच बंड्या येतो.
बाबा, मीया गुटो घालतयं
होय, तीया काय घालतलस, ही डीपळा मोडाक व्हयीत. आणि ह्यो सर्जो तुका ऐकतोलो, भायर पळत रवतोलो. गुट्याखाली गावलस तर याक करता दोन व्हयत
नायतर तुझ्यावंगडा गुट्यार बसा?”
ये बसं....

बंड्याला खुप आनंद होतो. बाबांच्या दोन्ही पायांच्या मध्ये गुट्यावर बसतो. पूर्ण कोपरा फिरुन झाल्यावरच गुट्यावरुन खाली उतरतो. दरम्यान ही सर्जा राजाची जोडी दोन तीन वेळा ह्या बंड्याला गुट्यासहीत कोपऱ्याबाहेर घेऊन जाते. हा जो गुट्यावर बसण्याचा आनंद काही औरच असतो. तो ज्यांनी-ज्यांनी अनुभवला आहे त्यांनाच समजू शकतो. एखाद्या एसी फोर व्हीलर मधून केलेल्या सफारी पेक्षाही हा मिळणारा आनंद खुपच उत्साही आणि नैसर्गिक असतो.

अशा प्रकारे सुरुवातीचे काही दिवस ही सुकी पेरणी चालू असते. दरम्यान पाऊस कमी झालेला असतो. शेतकरी आता मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत असतात. भात पेरणी, जोत, पाऊस अश्या गजालीनी मैफली रंगवत असतात. नाक्यावरच्या ह्या गजाली तर ऐकण्यासारख्याच असतात.

कीतीसा रे पेरलसं?” दाजींचा प्रश्न
खयला, जोत नाय धड, कशेतरी गुट्याखाली दोन कोपरे टाकलय सखाराम काकांच उत्तर. प्रत्यक्षात मात्र त्यानी चार कोपरे पेरणी केलेली असते. परंतु सवयीप्रमाणे, त्याला सांगताना दोनच केले म्हणून सांगणार.
ह्या पावसार पण शिरा पडली हा... दोन दिवस लागलो आणि आता तोंडा घेवन गेलो
होय रे असाच तापयल्यान तर पेरलेला पण करपान जाताला
आज मूळ भरान हां... रात्रीक काय तरी केल्यान तर करीत
दिसता तर खरा, पण ह्या वाऱ्याचो जोर खुप हा ना
चल, वायच ऐशयेर जावन येतयअसं म्हणत दाजी वेशीवर जायला निघतात. त्याना संध्याकाळचं घोटभर (दारु) घ्यायची सवय असते. हे घोटभर मिळण्याचं ठीकाण म्हणजेच वेशी.

दिवा लावणीची वेळ झालेली असते. कट्ट्यावरची मंडळी हळूहळू आपापल्या घरी परतात. काळ्याकुट्ट ढगांनी पाऊसही भरुन आलेला असतो आणि पुन्हा एकदा मध्यरात्री पासून जोराचा पाऊस बरसायला चालू होतो. आता मात्र हा पाऊस आमच्या कोकणात यापुढे गणपती आगमनापर्यंत मनमोकळेपणाने बरसत असतो. पुढेही तो कमी अधिक प्रमाणात पडत असतोच.

कोरड्या नदी, नाले पाण्याने भरुन वाहू लागतात. सर्व गावकरी भर पावसात या नद्या नाल्यांमध्ये मासे पकडायला धावत असतात. प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने मासे पकडत असतात. कोणी जाळ्याने पकडत असतात तर कोणी पुलाखालील पाईपामध्ये हाताने पकडत असतात. पहील्या पावसात नदी नाले वाहू लागले की सर्वात मोठा कार्यक्रम हा मासे पकडण्याचा असतो. त्याला चढणेचे मासे असे म्हणतात. या माश्यांना असणारी चव खुपच रुचक असते. माश्याचं टिकलं आणि भाकरीवर ह्यो आमचो शेतकरी चांगलोच ताव मारता. माझ्याही तोंडाला पाणी सुटलं. मासे पकडण्याचा एक दिवसाचा कार्यक्रम झाला की मात्र आमचा हा शेतकरी जोमाने शेतीच्या कामाला लागतो.

सुक्या भाताची पेरणी पूर्वीच केलेली असल्यामुळे आणि सतत पाऊस चालू झाल्यामुळे आता ओल्या भाताची पेरणी चालू होते. घरीच दोन दिवस टोपल्यांमध्ये भात भिजत घातल जात, त्याला अंकुर फुटल्यानंतर ते भात जोताने नांगरणी करुन चिखल केलेल्या कोपऱ्यांमध्ये पेरणी करतात. याला  दात्याखाली पेरलय किंवा रव पेरलय असे म्हणतात. सुके भात गुट्याखाली तर ओल भात दात्याखाली पेरल जातं. हा दाता म्हणजेच ज्याप्रमाणे गुट्याची फळी असते तश्याच प्रकारची परंतु त्याला दाताच्या आकाराने कोरलेल असत.

पाऊस मुसळधार चालू असल्यामुळे बऱ्याचवेळा ही केलेली ओली पेरणी वाहून जायची. मग या ठीकाणी परतही पेरणी करावी लागते. यावेळीही काही ठरलेले संवाद असतात.

दोन दिवस झाले मेल्यान काय डोळो उघडूक नाय, नुसतो वत वत वत्ताहा.
होय रे, ढोरांची कानीपण काढूक देना नाय.
पेरुन झाला काय रे?” दाजींचा सखाराम काकांना प्रश्न
खयला. यांची पेरणी पूर्ण झालेली असते तरीपण नाहीच म्हणायची सवय असल्यामुळेखयलाम्हणून सखाराम काका मोकळे होतात.
त्या होवटाचे दोन कोपरे पेरलेलय ते रात्रीच्या होवराक व्हावान गेले. वर आणखी हेही सांगतात.
मेल्या ह्या इतक्या पावसात तीया आधी थय पेरलस कसा काय?” दाजींनी सखाराम काकांचा कमीपणा काढला.
होय रे, वाटलेला इतको वशाडी पडाचो नाय. चल येतय
खय चललस
पायगाळयेत जातय, त्या भरडावरच्या कुनग्यांची पडणा बांधान येतय.
तीया तडे जातसच तर माझ्या त्या फाळयेच्या पडणावरपण वायच माती टाक. अस म्हणत दोघेही आपापल्या कांमाना जातात.

दरम्यानच्या आठ-दहा दिवसात तरवा (भाताची रोप) लावणीसाठी तयार होतो. चहूबाजुनी हीरवळ पसरलेली असते. तरवा काढणे आणि त्याची लावणी करण्याच्या कामाला जोरदार सुरुवात होते. शेता शेतानी हे एकच दृश्य असते. याठीकाणी घरवालणीचा (शेतकऱ्याची बायको) महत्वाचा रोल असतो. स्वत: आणि काही कामेरी (मजूरदार) घेऊन तरवा काढायला सुरुवात करते. सकाळी लवकर उठून घरातील सर्वांचं जेवण, नाश्ता बनवून आठ – नऊ वाजताच तरवा काढायला ती शेतात हजर असते.

लावणीवरुन आठवल म्हणून मुद्दाम याठीकाणी नमूद करावास वाटत. लावणी म्हटलं की आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील बंधूना पाय थिरकणारे नृत्य आठवणार, तर आमच्या कोकणी बंधूना भातशेतीची लागवड करणारे हात आठवणार. एका लावणीमध्ये पाय थिरकत असतात तर दुसऱ्या लावणीमध्ये हात थिरकत असतात. शेवटी दोघींचही थिरकणं हे पोटासाठीच असतं.

इकडे शेतकरी फोडणी, दुडणी करुन भाताच्या लावणीसाठी जमीनीची मशागत करत असतो. तर त्याची बायको तरवा काढून त्याच्या पेंड्या बांधून तरव्याची साठवणूक करत असते. सकाळपासून संध्याकाळी तीन – चार वाजेपर्यंत तरवा काढणे आणि त्यानंतर लावणी करणे हे नित्याच काम चालू असतं. हातात घड्याळ नसल तरीही एका ठरलेल्या वेळातच ही लावणीची माणसं लावणीसाठी हजर असतात. त्यामुळे शेतकऱ्यालाही तेवढच तत्पर रहावं लागत. लावणीसाठी ही मंडळी येण्यापूर्वीच अर्ध्यापेक्षा जास्त कोपऱ्याचा चिखल बनवून तयार असतो. हा चिखल बनवण्यातली आणि लावणी करण्यातली मजा, त्यातील गंमती जंमती ह्या न विसरण्यासारख्याच असतात. पाण्याचा पुरेसा वापर करत मुसमुशीत चिखल बनवलेला असतो. काहीवेळा तर एकमेकांवर नजर चुकवून चिखलही उडवत असतात. लावणी करणारी हाताने तर जोत धरणारा काठीने एकमेकांवर चिखल उडवत असतात.

ये बंड्या, कश्याक रे चिखल उडयतस. बंड्याची आई बंड्याला ओरडते.
ह्या बघ मगे बाय कसा, हेनीच आधी माझ्यावर उडयल्यान
गो पोरा काय जाता तुका? गप लावणी कर सांज जावक इली हां
आज चिखल मात्र बरो झालो हां शेतकऱ्याची बायको मध्येच बोलून जाते.
बांबानू, आई बघा काय म्हणता
काय गो म्हणताबांबानी ऐकूण न ऐकल्यासारख केल.
चिखल बरो झालोहा म्हणता
नशीब माझा, आज खय उगावलेला सर्वजण हसतात.

अशाप्रकारे गंमती जंमती, टोमणे मारत लावणी चालू असते. संध्याकाळची गरमा गरम चहाही या लावणीवर आणली जाते. सकाळची शेतकऱ्यांची न्याहारी (नाश्ता), तरवा काढणाऱ्यांच जेवणही कित्येकवेळी शेतावरच आणून जेवल जात. पावसापासून संरक्षण व्हाव म्हणून आमचा शेतकरी काका कांबळ्याची खोळ डोक्यावर घेतो, तर तरवा काढणाऱ्या महिला इर्ला वापरत. परंतु आता या काळ्या रंगाच्या कांबळ्याची आणि बांबूपासून बनवलेल्या इर्ल्याची जागा रेडीमेंट रेनकोटने घेतली आहे.

लावणी करत असताना पूर्ण अंगच चिखलाने माखलेलं असतं. हा चिखल बनवण्याआधी आमचा हा शेतकरी गुटाही घालत असतो. या पाण्यातील गुट्यावर बसण्याचा आनंद हा हजारो रुपये खर्च करुन वॉटर स्पोर्ट खेळणाऱ्या आनंदा पेक्षाही कित्येक पटीने अधिक असतो.

पुढे काही दिवस सर्वत्र शेती लावणीचीच कामे पहायला मिळतात. साधारणत: दोन महिने आमच्या या शेतकरी कुटूंबाला आणि बैलांना विश्रांती नसते. त्यांच्या हक्काची सुट्टी म्हणजेच एकादशी आणि अमावस्या. या दोन दिवशी जोत बांधल जात नाही. ही प्रथा पूर्वापार चालत आली आहे. अलीकडे या जोतांंच्या ऐवजी शेतांमध्ये ट्रॅक्टर फिरताना दिसत आहेत.

शेवटी लावणी संपवायच्या दिवशी, ज्या कोपऱ्यामध्ये शेवटची लावणी असेल त्याठीकाणी तरवा लावून त्याची पूजा केली जाते आणि आवो (तरव्याची काही रोप) घरी आणून घरच्या तुळशीमध्ये लावून त्याचीही पूजा केली जाते. या दिवशी आणखी एका विशेष कार्यक्रमाचाही बेत केला जातो. तो बेत म्हणजेच चिकलवणी. तरवा काढणे, लावणी करणे ही कामे संपल्याच्या खुशीत आमचा हा शेतकरी त्या रात्री कोंबडं कापून कोंबडी वड्यांचा बार उडवून देतो.

अशाप्रकारे ही आमच्या मालवणी शेतकऱ्यांची भात पेरणी, लावणी आणि चिकलवणी हा एकूणच शेतीचा प्रवास कष्टाचा असला तरीही स्फुर्तिदायक आणि तेवढाच मजेशीर, हवाहवासा वाटणारा आहे. आणि म्हणूनच आमच्या या मालवणी शेतकऱ्याला माझ्या या लेखणीने केलेला एक सलाम.


- भरत माळकर