Sunday, June 19, 2016

'बॅच'लर' प्रवासाला एक सलाम

शाळा साळगांव नं.२ च्या पहिलीच्या वर्गातून माझ्या शैक्षणिक आयुष्याला सुरुवात झाली. वर्ष होते, १९८१. आमच्यावेळी पहिली-दुसरीसाठी नोटबुक नव्हती. त्यामुळे जो काही श्रीगणेशा आणि अभ्यास असायचा तो पाटीवरच व्हायचा. पाटीवरुन होमवर्क लिहून आणायचो आणि जर का तो पुसला, तर घरी आईचे ओरडणे आणि दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांकडून 'प्रसाद' मिळायचा. शाळेतील टिळक पुण्यतिथी, गांधी जयंती साजरी होताना भाषणाची सुरुवात ठरलेली 'माझ्या पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र-मैत्रिणींनो, आज मी जे...' याच वाक्याने भाषणाची सुरुवात व्हावी असा अलिखित नियम होता. शिक्षणासोबतचा आवडता विषय म्हणजे खेळ. मग ते वैयक्तिक असो किंवा सांघिक. धावणे, रिले, लांबउडी, उंचउडी, कब्बडी, खो-खो अशा सगळ्याच खेळांमध्ये आम्ही मित्र हिरीरीने भाग घ्यायचो. खेळामध्ये माझा सहभाग लक्षणीय असायचा. आमच्या खेळाच्या स्पर्धा माणगांव हायस्कूलच्या पटांगणावर व्हायच्या. त्या ठिकाणी पारितोषिके हमखास ठरलेली असायचीच. त्या स्पर्धा म्हणजे आमच्यासाठी 'ऑलिंपिक'च होते.

प्राथमिक शाळेतील आमच्या सगळ्यांचा आवडता कालावधी म्हणजे सरस्वती पूजन. आपल्याला मिळालेले बक्षीस सर्व पालकांच्या उपस्थितीत स्वीकारताना छाती भरुन यायची. मी सहावीत असताना पडकील गुरुजींनी 'घाम हवा घाम' ही नाटिका आम्हाला घेऊन बसविली होती. त्यात मला राजाचे काम दिलेले. आपल्या कोकणातील पारंपारिक दशावतार कलाकारांचे कपडे परिधान करुन मी राजाची भूमिका साकारलेली. म्हणे, हा राजा काहींच्या मनातही गुंतला होता. आम्ही सहावी-सातवीच्या मुलांनी हे नाटक उत्तमरित्या सादर केले होते. त्यात संजय घाटकर, उदय घाटकर, आनंद कांदे, नारायण कोरगांवकर, केशव कोरगांवकर, किशोर घाटकर, मिलिंद गायचोर अशा माझ्या मित्रांनी भूमिका केलेल्या. प्राथमिक शाळेतील आणखी एक आठवण म्हणजे वनभोजन आणि सहल. वनभोजनासाठी जवळच्याच गावामध्ये चालत जायचो. शाळेमध्ये कधीही खेळायला न भेटणारा 'क्रिकेट' हा खेळ आम्ही खूप खेळायचो.

माझे आठवीपासूनचे शिक्षण श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयामध्ये (माणगांव हायस्कुल) झाले. माणगांव हायस्कूलमध्ये प्रवेश घेत असताना मनात खूप भीती होती. एवढ्या मोठ्या हायस्कूलमध्ये खूप शिक्षक, वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारी मुले आणि त्याहूनही मोठा दरारा होता तो म्हणजे त्यावेळचे हायस्कूलचे मुख्याध्यापक वि. न. आकेरकर सरांच्या कडक शिस्तीचा. हे हायस्कूल माझ्या घरापासून साधारणत: चार किमी दूर आहे. आम्ही सर्व मित्र चालत जायचो. पावसाळ्यात चालत जाण्याची मजा काही औरच होती. हायस्कूलमध्ये वेगवेगळ्या गावातून आलेल्या अनेकांच्या नवनवीन ओळखी झाल्या. काहीजणांशी मैत्री झाली. परंतु माझ्या लाजाळू स्वभावामुळे मी थोडासा त्यावेळी अबोल होतो. त्यामुळे मैत्री थोडी मर्यादितच होती. 

दहावी पूर्ण होवून आता २३ वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षानंतर दहावीच्या चारही तुकड्याचे एकत्रित गेटटुगेदर व्हावे अशी संकल्पना माझे मित्र भरत केसरकर, एकनाथ, शैलेश, विश्वजीत इत्यादींना सुचली आणि हे गेट-टुगेदर २४ मे २०१५ रोजी माणगांव हायस्कुल येथे झालेही. यावेळी आमचे त्यावेळचे सरही उपस्थित होते. त्यांचे बहुमोल विचार ऐकण्याची संधीही मिळाली.मीही माझे मनोगत व्यक्त केले होते. माणगांव हायस्कूलच्या शिक्षकांच्या आठवणी माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत. मराठीचेे शिक्षक भडभडे सर यांची वाक्ये,'तरणी झाली हरणी आणि म्हातारी झाली बरणी' आणि दुसरे 'रट्टो घाल रट्टो' आजही आठवतात. सर स्वत; कधीही विद्यार्थ्याना मारायचे नाहीत. पण जर कोणी वर्गात मस्ती करीत असेल, तर पाठीमागच्या विद्यार्थ्याला फटका मारायला सांगायचे. दुसरे पाटील सर त्यांचा भूगोलाचा तास म्हणजे आवाजाचा उच्चांक, पूर्ण वर्ग सरांच्या आवाजाने दणाणून जायचा. एवढ्या तळमळीने सर आम्हाला शिकवायचे, तर परब सरांचा इतिहासाचा तास कधी तो ४५ मिनिटांचा संपूच नये असे वाटायचे. त्यांच्या शिकवणीतून इतिहास डोळ्यासमोर उभा रहायचा. शिवाय आमचे आवडते सर कात्रे, त्यांच्या मुखातील मधुर वाणी ही साखरेच्या गोडव्याला लाजवेल अशीच. याव्यतिरिक्त नाईक, पिळणकर, भिसे, बावकर, सावंत, पवार, केसरकर, राजाध्यक्ष, कांबळी, पाटील या सर्वच शिक्षकांनी आम्हाला मोठ्या तळमळीने आणि आपुलकीने शिकवण दिली आहे. या सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.

आठवणीतील शिक्षणाचा शेवटचा टप्पा म्हणजे पदवी शिक्षण. माझे हे शिक्षण सावंतवाडी येथील एसपीके कॉलेजमध्ये झाले. त्यावेळच्या आठवणी जागवताना माझा प्रवास कसा व्हायचा हे चांगलेच आठवते. कॉलेजमधून घरी जात असताना सर्वात जिगरीचा विषय म्हणजेच सावंतवाडी बस स्टॅन्डवरुन दुपारी ३.१५ ची फुटब्रिज किंवा ४.३० ची शिवापूर गाडी पकडणे. या गाड्यांना खूपच गर्दी असायची आणि कधीच वेळेवर नसायच्या. त्यामुळे सहजासहजी बसायला सीट मिळणे खूपच कठीण. अशावेळी मित्र-मैत्रिणींसाठी सीट राखून ठेवायचे म्हणजे खूपच परिश्रम घ्यावे लागायचे. तरीही आम्ही सीट पकडायचो. कॉलेजमध्ये लेक्चरला बसणे कमी आणि बाहेर फिरणे जास्त असायचे. संजय परब, राजा नानचे, रमाकांत ताम्हाणेकर, जितेंद्र देसाई, रुपेश नाईक, मनोज साळगांवकर आणि मी, ही आमची कॉलेजची गँग होती.

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना बॅचलरपणातील आपणा सर्वांचाच जोश वाढतच असतो आणि जर का कुणाला कुठे प्रेमाची चाहूल लागलीच, तर मग या बॅचलरपणातील धुंदी बेधुंद करते आणि हा अनुभव मला वाटतं, सगळेजणच अनुभवत असतात.

शेवटी आपले 'दोनाचे चार हात' करण्याची वेळ येते आणि आपले लग्न ठरले म्हणून 'बॅचलर पार्टी' च्या नावाने मित्रांसोबत या बॅचलरपणाला निरोप देण्यात येतो, अशा या कधीही संपवू नयेत असे वाटणाऱ्या 'बॅच'लर प्रवासाला एक सलाम!!!

- भरत माळकर

No comments:

Post a Comment