Saturday, July 16, 2016

चिकलवणी (चिखलवणी)

सरीवर सरी कोसळत होत्या.... काळ्याकुट्ट ढगांनी सूर्यकिरणांना झाकूण टाकल होतं. सकाळचे दहा वाजून गेले होते तरीही आत्ताच सुर्य झोपेतून जागवतो की काय असचं काहीसं भासत होतं. नेहमीच गजबजलेल्या आणि घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबई शहरातील रेलचेल थोडीशी मंदावलेली दिसत होती. तर कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजामुळे माणसांच्या बोलण्याचा आवाज, गाडींचे हॉर्न, ट्रेनच धडधडनं, विमानांच रो-रोन... असे नैसर्गिक - अनैसर्गिक सर्वच ध्वनी काही प्रमाणात लुप्त पावले होते.

आज वारही चांगला होता, अर्थातच आपल्या नोकरदार वर्गाचा रविवार असल्यामुळे सगळं कसं आरामात चाललेल. मी गरमा गरम चहाचा आस्वाद घेत मुंबईतील आमच्या दहा बाय दहा च्या प्रशस्त खोलीतील गच्चीतून समोरील दोन खोलीतील छोट्याश्या गॅपमधून मुसळधार पावसाचं ते विशाल दृश्य बघत मनसोक्त कोसळणाऱ्या पावसाच्या रमणीय धुंदीत गुंग होऊन गेलो होतो... दरम्यान ही गुंगी मला एवढी चढली की, माझे हे मन मुंबई शहरातून थेट तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या साळगांव गांवी जावून कधी त्या धो-धो कोसळणाऱ्या पावसामध्ये मनसोक्त भिजू लागल होत, त्याचा मला थांगपत्ताच लागला नाही. गीतकार गुरु ठाकूर यांच्या मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे.... या गाण्याचा नेमका प्रत्यय मला आज आला होता.

अशाच या पावसाळ्यात आपल्या सिंधुदुर्गकरांची भात पेरणीपासून चालू झालेली धांदल, लगबग, त्यातील संवाद आणि बरचं काहीस... चिकलवणी, लावणीपर्यंत कसं मजेशीर असतं त्याचा माझ्या, तुमच्यासारख्या सिंधुदुर्गकरांनी अनुभवलेला, प्रत्यक्ष साकारलेल्या तमाम मनांना खुणावत असलेली ती दृश्ये रेखाटताना अक्षरश: त्या लावणीत मी चिकलावून गेलो होतो. पावसाळ्यातील भात शेतीच्या कामांच उभ चित्रच माझ्या डोळ्यांसमोर थैमान घालत होतं. माझ्यासोबत तूम्हीही त्या चिखलात माखून जाल हे नक्की.

जून महिन्यातील ७ तारीख होती. आमच्या मालवणी भाषेत सांगायचचं झाल तर, त्या दिवशी मिरग होतो. पावसाची मुहुर्तमेढ त्या दिवसापासून रोवली जात असल्याचा समज पूर्वापार चालत आलेला आहे. संध्याकाळचे ५ वाजले होते.... आमचे शेजारी सखाराम काका बाहेर फेरफटका मारायला निघालेले.

ये दाजी, पावस बरो पडलो नाय रे. सखाराम काका (सखो) एका-एका शेजाऱ्यांची घर घेत दाजीना आवाज देतो.
आणखी तासभर तरी मेल्याच्या तोंडार वशाडी पडाक व्हई व्हती. दाजी ठरलेलं वाक्य सखाऱामाच्या तोंडावर फेकतो.
मेल्या काय, इतको पडलो तरी खूप हां बा
काय खूप हां, ह्या पावसानं जमीन तरी पोकारतली? रात्री एखादी मोठी सर ईली तर मात्र बरी जमीन भिजतली
(सखाराम आकाशाकडे बघत...) आभाळ तर धरुन हां, बघया काय करता तो. चल येतय
बस रे जाशीत
नाय रे, सोनक्या सुताराकडे जावनं येतय, नागर पदराक नाया, तीया आपलो सगळी तयारी करुन बसलसं
मेल्या तुझे कोणी हात धरलेले. मे म्हयन्यात तीया लग्नाचे वडे खावक पडलेलस... त्या वड्यांपुढे तुका काय सुचाच नाय व्हता दाजीनी सखाराम काकांच्या नेमक्या मुद्द्याला हात घातला.... बिचारे सखाराम काका जायला निघतात.

पहिल्या पावसानंतर नाक्या- नाक्यांवर, शेजारी-पाजारी अश्या संवादांची मेजवानी आमच्या मालवणी कोकणात सर्रास चाखायला मिळते. सख्याने म्हटल्याप्रमाणे रात्री चांगलाच पाऊस बरसतो. आजपासून पावसाळी शेतीच्या कामांना सुरुवात करण्याच्या इराद्याने आमचे शेतकरी बांधव पहाटे पाच-साडेपाचच्याच ठोक्याला उठून जोत घेऊन जायच्या तयारीला लागतो. घरातील मोठी व्यक्ती घाईगडबडीने चहा पित जोतासाठी लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करु लागतो. घरातील इतर मंडळींना उठवत तो हे सर्व करत असतो.

बंड्या, चल उठ, दिवस बघ किती वर इलो हां असं म्हणत सखाराम काका आपल्या मुलाच्या  अंगावरची गोडदी ओढतात.
थांब रे बाबा, थोडो येळ झोपतयं
मेल्या झोपतय काय, त्या चंद्याचो पोर बघ इतक्यात तेचो येक कोपरो धरुन झालो असतोलो. तिया रात्री अर्धे रात्री मिरवान मिरवान येतस आणि सकाळी दिवस डोक्यार इलो तरी ढेंगा वर करुन टांगून देतसं बाबांनी नेमकी संधी साधली. 
बंड्या उठतो, तोंड धुवून चहा पित असतानाच गुरांच्या गोठ्यातून पुन्हा आवाज येतो.
बंड्या झाला काय रे
व्हय व्हय येतयं
ह्या बघ, मीया बैलांका आणि जू घेवन जातय. तीया ह्यो नांगर आणि कुदळ घेवन मधल्या शेतात येत्याचे बाबा त्याला सांगतात.
तुम्ही जाया ओ, तो बरोब्बर येतलो. उगाच त्याच्यापाटी कटकट नको मध्येच स्वयंपाक घरातून शेतकऱ्याच्या बायकोचा आवाज येतो.
व्हय गो, तिया गप रवं, तुझ्यामुळेच तो शेफारलो हा. कधी काय सांगूक गेलय काय तीया तेची बाजू घेतस असं दबक्या आवाजात बोलत बिचारे सखाराम काका बैलांना घेऊन शेतावर जायला निघतात.

हा आमचा शेतकरी कित्येक दिवसानंतर बैलांना जोतासाठी जुंपणार असतो त्यामुळे त्याचे बैल थोडेशे सैरभैर पळतात. त्याचे बैल म्हणजे त्याच्यासाठी सर्जा-राजाचीच जोडी असते. या सर्जा-राजांना बरेच दिवस जोताची सवय नसल्यामुळे सुरुवातीला ते खुपच वेडे-वाकडे घेत असतात. तरीही आमचा हा शेतकरी त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवत, सर्जा-राजा हाक मारत जोतासाठी जुंपतो आणि नांगर घेऊन येणाऱ्या बंड्याच्या वाटेवर नजर लावून बसतो. दहा-पंधरा मिनिटे झाली तरी हा बंड्या काही येत नाही. शेवटी वैतागुन सखाराम काका कुकारा (मोठ्याने ओरडणे) देतो. सोबत प्रेमाने चार शिव्याही झाडतो. तेवढ्यातच बंड्या त्याच्या नजरेस पडतो.

मेल्या पाय उचल, दिस बघ डोक्यार इलो हां
बंड्या थोडासा जोरात चालल्यासारखा करतो. ते त्याच्याकडून नांगर घेतात, जुवाला बांधतात आणि जोत हाकायला सुरुवात करतात.
हीरी हीरी.... फाफारी....
भायर खय ओढतस....भूतूर ये.... सामको चलं....
पावलार ये....

अशा या ठरलेल्या मालवणी शब्दांचा वापर करत आमचा शेतकरी जोत हाकवीत असतो. आमच्या या जोताच्या गुरांना ही भाषा उत्तमरित्या अवगत झालेली असते. पहील्या पावसानंतरची ही पहीलीच नांगरणी असल्यामुळे नांगर धरायला कठीण येत असतं. हात दुखत असतात, बैलांना नांगर ओढायलाही त्रास होत असतो. यालाच फोडणी असे म्हणतात. फोडणी, दुडणी आणि त्यानंतर गुटा घालून जमिनीची मशागत करुन भात पेरणी केली जाते. या भात पेरणीला गुट्याखाली पेरलयं असही संबोधले जाते.
फोडणी, त्यानंतर दुडणी (जमिनीची उभी-आडवी मशागत) करुन झाल्यानंतर आता गुटा (जमिनीवर फिरवायची लाकडी फळी) फिरवायची वेळ येते. आपल्या पन्नास टक्के शेतकऱ्यांजवळ गुटा नावाचे अवजार नसतच. आणि ज्यांच्याजवळ असेल ते सुस्थितीत असेलच याची शक्यता खुपच कमी असते. दुडणीची नांगरणी संपायला काही अवधी असतानाच सखाराम काका बंड्याला हाक मारतात.

बंड्या.... ये बंड्या. बंड्या काहीच प्रतिउत्तर देत नाही. तो तिकडे इतर मुलांसोबत खेळत असतो. सखाराम काका जोत उभं करतात आणि आपल्या प्रेमळ भाषेत बंड्याला आवाज देतात.
मेल्या बंड्या, तुझे कान फुटले काय रे? हडे ये तेव्हा कुठे तो बंड्या धावत येतो.
काय झाला? कीत्याक आरडतसं बंड्याही तेवढ्याच प्रेमळ पध्दतीने प्रतिउत्तर देतो.
अरे, त्या परश्याच्या जोतार गुटो असलो तो घेवन ये

बंड्या गुटा आणायला जातो खरा परंतु त्या परश्यालाही गुटा घालायचा असल्यामुळे तो तिथेच पंधरा मिनटे थांबतो. इकडे हे काका नांगर सोडून गुट्याची वाट बघत बसतात. तेवढ्यातच बंड्या येतो.
बाबा, मीया गुटो घालतयं
होय, तीया काय घालतलस, ही डीपळा मोडाक व्हयीत. आणि ह्यो सर्जो तुका ऐकतोलो, भायर पळत रवतोलो. गुट्याखाली गावलस तर याक करता दोन व्हयत
नायतर तुझ्यावंगडा गुट्यार बसा?”
ये बसं....

बंड्याला खुप आनंद होतो. बाबांच्या दोन्ही पायांच्या मध्ये गुट्यावर बसतो. पूर्ण कोपरा फिरुन झाल्यावरच गुट्यावरुन खाली उतरतो. दरम्यान ही सर्जा राजाची जोडी दोन तीन वेळा ह्या बंड्याला गुट्यासहीत कोपऱ्याबाहेर घेऊन जाते. हा जो गुट्यावर बसण्याचा आनंद काही औरच असतो. तो ज्यांनी-ज्यांनी अनुभवला आहे त्यांनाच समजू शकतो. एखाद्या एसी फोर व्हीलर मधून केलेल्या सफारी पेक्षाही हा मिळणारा आनंद खुपच उत्साही आणि नैसर्गिक असतो.

अशा प्रकारे सुरुवातीचे काही दिवस ही सुकी पेरणी चालू असते. दरम्यान पाऊस कमी झालेला असतो. शेतकरी आता मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत असतात. भात पेरणी, जोत, पाऊस अश्या गजालीनी मैफली रंगवत असतात. नाक्यावरच्या ह्या गजाली तर ऐकण्यासारख्याच असतात.

कीतीसा रे पेरलसं?” दाजींचा प्रश्न
खयला, जोत नाय धड, कशेतरी गुट्याखाली दोन कोपरे टाकलय सखाराम काकांच उत्तर. प्रत्यक्षात मात्र त्यानी चार कोपरे पेरणी केलेली असते. परंतु सवयीप्रमाणे, त्याला सांगताना दोनच केले म्हणून सांगणार.
ह्या पावसार पण शिरा पडली हा... दोन दिवस लागलो आणि आता तोंडा घेवन गेलो
होय रे असाच तापयल्यान तर पेरलेला पण करपान जाताला
आज मूळ भरान हां... रात्रीक काय तरी केल्यान तर करीत
दिसता तर खरा, पण ह्या वाऱ्याचो जोर खुप हा ना
चल, वायच ऐशयेर जावन येतयअसं म्हणत दाजी वेशीवर जायला निघतात. त्याना संध्याकाळचं घोटभर (दारु) घ्यायची सवय असते. हे घोटभर मिळण्याचं ठीकाण म्हणजेच वेशी.

दिवा लावणीची वेळ झालेली असते. कट्ट्यावरची मंडळी हळूहळू आपापल्या घरी परतात. काळ्याकुट्ट ढगांनी पाऊसही भरुन आलेला असतो आणि पुन्हा एकदा मध्यरात्री पासून जोराचा पाऊस बरसायला चालू होतो. आता मात्र हा पाऊस आमच्या कोकणात यापुढे गणपती आगमनापर्यंत मनमोकळेपणाने बरसत असतो. पुढेही तो कमी अधिक प्रमाणात पडत असतोच.

कोरड्या नदी, नाले पाण्याने भरुन वाहू लागतात. सर्व गावकरी भर पावसात या नद्या नाल्यांमध्ये मासे पकडायला धावत असतात. प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने मासे पकडत असतात. कोणी जाळ्याने पकडत असतात तर कोणी पुलाखालील पाईपामध्ये हाताने पकडत असतात. पहील्या पावसात नदी नाले वाहू लागले की सर्वात मोठा कार्यक्रम हा मासे पकडण्याचा असतो. त्याला चढणेचे मासे असे म्हणतात. या माश्यांना असणारी चव खुपच रुचक असते. माश्याचं टिकलं आणि भाकरीवर ह्यो आमचो शेतकरी चांगलोच ताव मारता. माझ्याही तोंडाला पाणी सुटलं. मासे पकडण्याचा एक दिवसाचा कार्यक्रम झाला की मात्र आमचा हा शेतकरी जोमाने शेतीच्या कामाला लागतो.

सुक्या भाताची पेरणी पूर्वीच केलेली असल्यामुळे आणि सतत पाऊस चालू झाल्यामुळे आता ओल्या भाताची पेरणी चालू होते. घरीच दोन दिवस टोपल्यांमध्ये भात भिजत घातल जात, त्याला अंकुर फुटल्यानंतर ते भात जोताने नांगरणी करुन चिखल केलेल्या कोपऱ्यांमध्ये पेरणी करतात. याला  दात्याखाली पेरलय किंवा रव पेरलय असे म्हणतात. सुके भात गुट्याखाली तर ओल भात दात्याखाली पेरल जातं. हा दाता म्हणजेच ज्याप्रमाणे गुट्याची फळी असते तश्याच प्रकारची परंतु त्याला दाताच्या आकाराने कोरलेल असत.

पाऊस मुसळधार चालू असल्यामुळे बऱ्याचवेळा ही केलेली ओली पेरणी वाहून जायची. मग या ठीकाणी परतही पेरणी करावी लागते. यावेळीही काही ठरलेले संवाद असतात.

दोन दिवस झाले मेल्यान काय डोळो उघडूक नाय, नुसतो वत वत वत्ताहा.
होय रे, ढोरांची कानीपण काढूक देना नाय.
पेरुन झाला काय रे?” दाजींचा सखाराम काकांना प्रश्न
खयला. यांची पेरणी पूर्ण झालेली असते तरीपण नाहीच म्हणायची सवय असल्यामुळेखयलाम्हणून सखाराम काका मोकळे होतात.
त्या होवटाचे दोन कोपरे पेरलेलय ते रात्रीच्या होवराक व्हावान गेले. वर आणखी हेही सांगतात.
मेल्या ह्या इतक्या पावसात तीया आधी थय पेरलस कसा काय?” दाजींनी सखाराम काकांचा कमीपणा काढला.
होय रे, वाटलेला इतको वशाडी पडाचो नाय. चल येतय
खय चललस
पायगाळयेत जातय, त्या भरडावरच्या कुनग्यांची पडणा बांधान येतय.
तीया तडे जातसच तर माझ्या त्या फाळयेच्या पडणावरपण वायच माती टाक. अस म्हणत दोघेही आपापल्या कांमाना जातात.

दरम्यानच्या आठ-दहा दिवसात तरवा (भाताची रोप) लावणीसाठी तयार होतो. चहूबाजुनी हीरवळ पसरलेली असते. तरवा काढणे आणि त्याची लावणी करण्याच्या कामाला जोरदार सुरुवात होते. शेता शेतानी हे एकच दृश्य असते. याठीकाणी घरवालणीचा (शेतकऱ्याची बायको) महत्वाचा रोल असतो. स्वत: आणि काही कामेरी (मजूरदार) घेऊन तरवा काढायला सुरुवात करते. सकाळी लवकर उठून घरातील सर्वांचं जेवण, नाश्ता बनवून आठ – नऊ वाजताच तरवा काढायला ती शेतात हजर असते.

लावणीवरुन आठवल म्हणून मुद्दाम याठीकाणी नमूद करावास वाटत. लावणी म्हटलं की आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील बंधूना पाय थिरकणारे नृत्य आठवणार, तर आमच्या कोकणी बंधूना भातशेतीची लागवड करणारे हात आठवणार. एका लावणीमध्ये पाय थिरकत असतात तर दुसऱ्या लावणीमध्ये हात थिरकत असतात. शेवटी दोघींचही थिरकणं हे पोटासाठीच असतं.

इकडे शेतकरी फोडणी, दुडणी करुन भाताच्या लावणीसाठी जमीनीची मशागत करत असतो. तर त्याची बायको तरवा काढून त्याच्या पेंड्या बांधून तरव्याची साठवणूक करत असते. सकाळपासून संध्याकाळी तीन – चार वाजेपर्यंत तरवा काढणे आणि त्यानंतर लावणी करणे हे नित्याच काम चालू असतं. हातात घड्याळ नसल तरीही एका ठरलेल्या वेळातच ही लावणीची माणसं लावणीसाठी हजर असतात. त्यामुळे शेतकऱ्यालाही तेवढच तत्पर रहावं लागत. लावणीसाठी ही मंडळी येण्यापूर्वीच अर्ध्यापेक्षा जास्त कोपऱ्याचा चिखल बनवून तयार असतो. हा चिखल बनवण्यातली आणि लावणी करण्यातली मजा, त्यातील गंमती जंमती ह्या न विसरण्यासारख्याच असतात. पाण्याचा पुरेसा वापर करत मुसमुशीत चिखल बनवलेला असतो. काहीवेळा तर एकमेकांवर नजर चुकवून चिखलही उडवत असतात. लावणी करणारी हाताने तर जोत धरणारा काठीने एकमेकांवर चिखल उडवत असतात.

ये बंड्या, कश्याक रे चिखल उडयतस. बंड्याची आई बंड्याला ओरडते.
ह्या बघ मगे बाय कसा, हेनीच आधी माझ्यावर उडयल्यान
गो पोरा काय जाता तुका? गप लावणी कर सांज जावक इली हां
आज चिखल मात्र बरो झालो हां शेतकऱ्याची बायको मध्येच बोलून जाते.
बांबानू, आई बघा काय म्हणता
काय गो म्हणताबांबानी ऐकूण न ऐकल्यासारख केल.
चिखल बरो झालोहा म्हणता
नशीब माझा, आज खय उगावलेला सर्वजण हसतात.

अशाप्रकारे गंमती जंमती, टोमणे मारत लावणी चालू असते. संध्याकाळची गरमा गरम चहाही या लावणीवर आणली जाते. सकाळची शेतकऱ्यांची न्याहारी (नाश्ता), तरवा काढणाऱ्यांच जेवणही कित्येकवेळी शेतावरच आणून जेवल जात. पावसापासून संरक्षण व्हाव म्हणून आमचा शेतकरी काका कांबळ्याची खोळ डोक्यावर घेतो, तर तरवा काढणाऱ्या महिला इर्ला वापरत. परंतु आता या काळ्या रंगाच्या कांबळ्याची आणि बांबूपासून बनवलेल्या इर्ल्याची जागा रेडीमेंट रेनकोटने घेतली आहे.

लावणी करत असताना पूर्ण अंगच चिखलाने माखलेलं असतं. हा चिखल बनवण्याआधी आमचा हा शेतकरी गुटाही घालत असतो. या पाण्यातील गुट्यावर बसण्याचा आनंद हा हजारो रुपये खर्च करुन वॉटर स्पोर्ट खेळणाऱ्या आनंदा पेक्षाही कित्येक पटीने अधिक असतो.

पुढे काही दिवस सर्वत्र शेती लावणीचीच कामे पहायला मिळतात. साधारणत: दोन महिने आमच्या या शेतकरी कुटूंबाला आणि बैलांना विश्रांती नसते. त्यांच्या हक्काची सुट्टी म्हणजेच एकादशी आणि अमावस्या. या दोन दिवशी जोत बांधल जात नाही. ही प्रथा पूर्वापार चालत आली आहे. अलीकडे या जोतांंच्या ऐवजी शेतांमध्ये ट्रॅक्टर फिरताना दिसत आहेत.

शेवटी लावणी संपवायच्या दिवशी, ज्या कोपऱ्यामध्ये शेवटची लावणी असेल त्याठीकाणी तरवा लावून त्याची पूजा केली जाते आणि आवो (तरव्याची काही रोप) घरी आणून घरच्या तुळशीमध्ये लावून त्याचीही पूजा केली जाते. या दिवशी आणखी एका विशेष कार्यक्रमाचाही बेत केला जातो. तो बेत म्हणजेच चिकलवणी. तरवा काढणे, लावणी करणे ही कामे संपल्याच्या खुशीत आमचा हा शेतकरी त्या रात्री कोंबडं कापून कोंबडी वड्यांचा बार उडवून देतो.

अशाप्रकारे ही आमच्या मालवणी शेतकऱ्यांची भात पेरणी, लावणी आणि चिकलवणी हा एकूणच शेतीचा प्रवास कष्टाचा असला तरीही स्फुर्तिदायक आणि तेवढाच मजेशीर, हवाहवासा वाटणारा आहे. आणि म्हणूनच आमच्या या मालवणी शेतकऱ्याला माझ्या या लेखणीने केलेला एक सलाम.


- भरत माळकर 


No comments:

Post a Comment