Saturday, December 3, 2016

एक हजारी अर्ध हजारी


तारीख ८ नोव्हेंबर, वेळ रात्री ८ ची... ८ ला ८ च्या ठोक्याला आपल्या पंतप्रधान महोदयांच मेरे प्यारे देशवासींयो... प्यारे भाई बहनों... हे ब्रीद वाक्य तमाम जनतेच्या कानावर पडलं आणि क्षणातच भारत देशात हाहाकार माजला. गरीब-श्रीमंत, सामान्य-वीआयपी, शेतकरी-नोकरदार, दलाल-व्यापारी आणि विशेष म्हणजे व्हाईट मॅन ते ब्लॅक मॅनपर्यंत सर्वजणच हादरुन गेले. न्यूज चॅनलवर नोटाबंदी चालू असतानाच व्हाट्सअँपवरुन ही बातमी काही क्षणातच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली. १०-१५ मिनीटे होता न होता तोच व्हाट्सअँप वर विनोदी मेसेजनी थैमान घातलं.

एवढ्यातच आमच्या हजारीने पाचशीला फोन केला.
अर्ध हजारी    - हॅलो..... बोल गं
एक हजारी    - हॅलो..... अगं मी बोलते... हजारी
अर्ध हजारी    - हो... हो ओळखलं, मला वाटलेलचं तू फोन करणार ते.
एक हजारी    - काय, कशी आहेस.
अर्ध हजारी    - एकदम मस्त, तू कशी आहेस?
एक हजारी    - मी तर फस्तच... बरं, बातमी समजली का?
अर्ध हजारी    - नाही समजायला काय झालं, मी तर इथेच आहे.
एक हजारी    - कुठे?
अर्ध हजारी    - मेदीकाकांच्या खिशातच, सर्व काही आँखो देखा हाल कॉमेंट्री ऐकत आहे.
एक हजारी    - अरे व्वा... तू तर या सुवर्ण क्षणाची साक्षीदारच बनलीस म्हणायचं.
अर्ध हजारी    - हो गं, बरं तू कुठे आहेस?
एक हजारी    - अजून कुठे असणार... पवरकाकांच्या खिशात
अर्ध हजारी    - हीहीही... तू तर नेहमी त्यांच्याच खिशात असते. मला तर त्यांच्या खिशात चुकून कधीतरी राहायची संधी भेटली तर. पवरकाकांनी तर त्या शंभरी कींवा पन्नासीला नो एन्ट्रीचा बोर्डच लावून टाकलाय म्हणे…! हे खर आहे का?
एक हजारी    - खरंच आहे ते, अश्या छोट्यांना ते सोबत घेतच नाहीत. “हम सस्ते चिजोंका शौक नही रखतेंअसंच त्यांच असतं.
अर्ध हजारी    - त्यांच चालू दे... तू सांग, तूला आता कस वाटतयं?
एक हजारी    - कस वाटतय! मला तर बाई आनंदाच्या उकाळ्याच फुटल्या आहेत. पण फुटल मेल आमच ते नशीब या पवरकाकांच्या खिशात मी तर पुरती कोंबूनच गेली आहे.
अर्ध हजारी    - आता मात्र सुटलीस एकदाची
एक हजारी    - हो ना... बरीच वर्षे झालेली कधी एकदा बरबरटलेल्या लोकांच्या जाळ्यातून सुटते असंच झालेलं.
अर्ध हजारी    - हो गं... मागचे आपले घरमालक सिंगाकाका, आम्हाला बदलायला बघत होते पण त्यांना कोणी काही ते जमूच दीलं नाही.
एक हजारी    - सर्वच चोराचे साक्षीदार कस जमू देणार. ते बिचारे २५, ५० पै ला बंद करुन गप्प बसले.
अर्ध हजारी    - हो ना... कींमत नसलेल्यालाच झीरो करुन बसले.
एक हजारी    - त्यांच काही न बोललेलचं बरं, आपल्याला खुपच भ्रष्ट करुन सोडलं बाई त्यांनी... अगं मागच्या महीन्यात मी त्या अंबाभाईच्या घरी होते तेव्हा मला थोडीफार कूणकूण लागलेली, हे असं काहीतरी होणार याची.
अर्ध हजारी    - मेली तू कधी काही असं बोलली नाहीस?
एक हजारी    - कसं बोलणार, मी तर त्या हजारांच्या बंडलामध्येच कोंबून गेलेली. तोंड उघडायला जागाच नव्हती.
अर्ध हजारी    - त्यांच काय बाई, सगळचं त्यांच्या मुठ्ठी मे”
एक हजारी    - हो ना, पण खर सांगते हां... अगं आपल्यासाठी हपापलेले लोक ह्या निर्णयापर्यंत पोहचतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. शेवटी मेदीकाकांनी ते करुन दाखवलं.
अर्ध हजारी    - नाही गं... सर्वांनाच दोषी देवून नाही चालणार. या देशात बरेच प्रामाणिक माणसंदेखील आहेत जे आमचा वापर सन्मानाने करतात आणि मेहनतीचच स्विकारतात.
एक हजारी    - हे मात्र तूझ खरं आहे. अशी माणसं आहेत म्हणूनच तर आज हा निर्णय झाला. नाहीतर कुटच काय, लक्ष्मीच्या नांवाने आमची पूजा करायची आणि चुकीच्या मार्गांनी, बेहीशेबी, गोरगरीबांना लुबाडूण मर्यादेपेक्षा आमची साठवणूक करायची.
अर्ध हजारी    - मनातलं बोललीस बाई तू, या निर्णयाने बड्याबड्यांच्या पोटात दुखणार, काहींच्या झोपाही उडतील तर काहीजण या विरोधात आंदोलनही करतील.
एक हजारी    - हो ना... अस तर होणारचं
अर्ध हजारी    - तुला तर माहीतच आहे, आमचा वापर कीती गलीच्छ पध्दतीने व्हायचा.
एक हजारी    - हो तर...
अर्ध हजारी    - काहींनी तर आमच्याच सेम टू सेम कॉपी करुन या बाजारात आणल्या आणि आम्हा खऱ्यांची कींमतच कमी केली.
एक हजारी    - हो गं... अश्याने तर कष्टाने कमवणारे लोकही आम्हाला स्विकारत नव्हते.
अर्ध हजारी    - हो ना, शंभरवेळा तरी पारखून निरखून बघायचे. शिवाय आमचा सिरियल नंबर देखील नोंद करुन ठेवायचे. आपल्या वरचा ना विश्वासच उडालेला बघ.
एक हजारी    - सुटलो बाई... सुटलो एकदाचे
अर्ध हजारी    - आता ती दोन हजाराची महाराणी आली आहे.
एक हजारी    - हो समजलं. तिने तर आल्या आल्याच रंग दाखवायला सुरुवात केली.
अर्ध हजारी    - हीहीही... आपण मेली एवढी वर्षे आहोत पण कधी असा रंग बदलला नाही.
एक हजारी    - हो ना... आणि वर म्हणते माझी कॉपी कोणीच करु शकत नाही.
अर्ध हजारी    - अगं तिने हा जग पाहीलाय कुठे? आत्ताच तर आली आहे. थोडे दिवस जाऊ दे, तिला तेही समजणार, या दुनियेतील लोक कीती महाभाग आहेत ते.
एक हजारी    - हीहीही... तेव्हा मात्र तिचा पुरता रंग उडालेला असेल.
अर्ध हजारी    - चल गं... आमच्या मेदीकाकांची मुलाखत संपली. उध्या सकाळपासून बँकेतच भेटू.
एक हजारी    - हो हो... मस्त एसीमध्ये बसूनच गप्पा मारु. बाय...
अर्ध हजारी    - बाय... गुड डिसीजन!!!


भरत वि. माळकर

No comments:

Post a Comment