Friday, May 22, 2020

कोरोना गजाली


मालवणी कोरोना गजाली 
  

कोरोनाच्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आणि सर्व काही एकाच जागी थांबलं गेलं. प्रत्येकजण स्वखुषीने नाही पण कोरोनाच्या तसेच पोलीसांच्या दंडुक्याच्या भितीने घरीच थांबू लागले.

नो मॉर्निंग वॉक... नो इविनींग वॉक, नो गार्डन... नो जिम, नो मार्केट... नो शॉपिंग, नो सिनेमा... नो लाईव शो, नो पिकनीक... नो विक एंड... सर्व सर्व काही बंद म्हणजे बंद. पव्लिक, वर्क फ्रॉम होमच्या नांवे फक्त आणि फक्त घरीच थांबू लागले. अश्या ह्या लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसात तर खुपच कंटाळा येत होता. मग मित्रांना फोन करा, पाहुण्या मंडळींना नाहीतर मग गाववाल्यांना. यातूनही कंटाळा आला तर मग व्हॉटस्अप, इंटरनेट किंवा TV तर आहेतच. जेव्हापासून हे व्हॉटस्अप पब्लिकच्या आयुष्यात आलय तेव्हापासून माझ्याजवळ रिकामा वेळ आहे असं कोणाला वाटणचं बंद झालय.

सतत व्हॉटस्अप, इंटरनेट किंवा टीवी यांचाही हळूहळू कंटाळा येऊ लागला. अश्यावेळी गाववाल्यांना किंवा पाहुणे मंडळींना फोन केल्यावर एकच गोष्ट बोलली जायची ती म्हणजे, ‘गावी जायला मिळालं पाहीजे होत’. तर अश्याच एका गाववाल्याला मी फोन केला ज्याला फोनवर एक एक तास बोलायची सवय आहे. परंतु नेहमीप्रमाणेच त्याचा फोन बीझी येत होता. थोड्यावेळानंतर त्याचाच फोन धडाडला आणि मुंबईतील कोरोना पासून गोष्टींना सुरुवात झाली ती चीन, अमेरीका, इंग्लंड अशी जगवारी करुन आमच्या कोकणातल्या गावी जावून थांबली.

“काय रे इतको येळ कोणाशी बोलत होतस?” मी विचारलं

“नाय तो अमुक होतो...” आता हा काय सांगणार, कोणाशी बोलत होतो ते याची कॉन्टॅक्स काय कमी आहेत. असो, मी पण काही जास्त खोलात जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर आमच्या कोरोना गजालींना सुरुवात झाली.

“काय रे घरात बसान कंटाळो इलोहा की नाय?”

“अरे नाय कसो... तुझा आपला बरा हा, हेच्या तेच्याशी फोनवर बोलान नायतर चाटींग करुन तरी येळ जाता”

“कसलो रे येळ जाता, कीती फोनवर बोलत आणि चाटींग करत बसतलस, आता हेचोपण कंटाळो ईलोहा. गावाक एकदा जावक गावलेला तर बरा होता. सरकारनेपण काय फालतुगिरी केल्यान लगेचच ट्रेन बंद करुन टाकल्यान. दोन दिवस तरी ट्रेन चालू ठेवक व्हये होते, मी तर गावाकच जाणार होतय. लॉकडाऊन असला तरी गावाक बाकी काय टेन्शंन नाय, भायर भुतूर थोडा फीराक गावता आणि कंटाळो पण नाय येणा”

“हो रे, आता स्वत:ची गाडी नायतर भाड्यान गाडी घेवन जावक इला असता पण तेका परमिशन नाय. सगळीकडे जिल्हा बंदी केल्यानी हा”

“अरे जिल्हा बंदी खयली गाव बंदी हा. गावात तर ह्या वाडीतून त्या वाडीवर जावक देणत नाय. जय थय रस्त्यांवर आडे घातल्यांनी हत आणि आपल्यासारखो एखादो चाकरमानी तेंका दीसलो तर मग काय बघूकच नको. जसा काय भुत बघल्यासारख्या करतत”

“होय रे काय सांगतलस, पण हय ह्या खोलयेत रवान रवान जीव घुसमाटाक लागलो हा. पोरा तर शापच कंटाळांन गेली हत”

“हो, गरमी पण जाम वाढली हा. ह्या वन आरके आणि १० बाय १० च्या खोलयेत रवाक व्हया, दुपारचा तर ह्या फॅनच्या हवेन आणखीनच हुलपाक होता. असा वाटता ह्या कोरोनान मरण्यापेक्षा घुसमाटानच मराक होयत.”

“हं.. गावाक कसा गरमी असली तरी इतक्या काय वाटणा नाय. खळ्यात तरी खुर्ची टाकून हडे तडेचे गजाली तरी मारुक गावतत. हडे ह्या खोलयेच्या भायर पाय टाकूक भेटणा नाय. नाक्या नाक्यावर पोलिस दांडे घेवन उभे आसत”

“होय बा, ता तर याक नसाता लफाडा हा. तुका म्हायत हां?”

“काय?”

“त्यादिवशी आपलो तो मधल्या वाडीतलो बाळू, गाढव नाक्यावर रवता तो, असोच सकाळी आरामात उठलो नाष्टापाणी केल्यान नी मित्रासोबत नाक्यार गेलो. नाक्यावरच्या बसटॉपवर दोघय व्हॉटस्अपवर टायमपास करीत बसलेले. तेवढ्यातच इले पोलिस, हे मेले व्हॉटस्अपात गुंग झालेले. ह्या मेल्यांचो लक्षच नाय. पोलिसांनी धरल्यानी, तुम्ही हय येवन टायमपास करतात ता तुमका घर नाय म्हणत बरे दोन दोन दांडे नको त्या जागेवर ठेवन दिल्यानी. बाळू सांगा होतो, दोन दिवस झाले तरी अजून ते फटके दुखतत”

“हाहाहा... मेल्यांनो गप घरात बसाचा सोडून कीत्याक भायर फिरक होया”

“बघ तरी, पण आता इतक्या स्ट्रिक नाय, शेवटी पोलिस पण कंटाळतत ना. कीती जणांका तरी समजायत बसतले”

“हो ना, आता तेंकाच तेंचो जीव नको झालो हा. बिचाऱ्या बऱ्याच पोलिसांकापण करोनाची लागण झाली हा”

“होय तर... ह्या मेल्या चिनी लोकांवर फटकी भरली ना खयसून ह्यो विषाणू आणल्यानी काय म्हायत. पुऱ्या जगाची वाट लावन टाकल्यानी”

“काय सांगतलस लोकांचे उपासमारीची येळ ईली हा. ह्या असाच चालू रवला तर नोकऱ्या धंद्यांचेपण वांदे होतले”

“आमच्यासारख्या प्रावेट नोकरेवाल्यांका तर टेंन्शनच हा... ह्या सगळा टेंन्शन आसताना आमचा सरकार सांगता आत्मनिर्भर बना. डोमलाचा आत्मनिर्भर बनतलं! ह्यो शब्द उच्चारतानाच घसो कोरडो पडता”

“हो ना... अमेरिका, इंग्लंड, इटली, फ्रान्स, रशिया यासारख्या मी मी म्हणाऱ्या देशांनी ह्या कोरोना पुढे हात टेकल्यानी हत. आपलो ते कोण रे... ”

“कोण?”

“ते रे अमेरिकेचे अध्यक्ष, आत्ताच मोदीनी तेंका गुजराताक हाडलेल्यानी ते”

“हां...हां... ते... डोनाल्ड ट्रम्प. ते तर चिनच्या नावांन दगडच फोडतत”

“हो. मेल्या सध्या परिस्थितीच तशी कठीण हा. आपल्या महाराष्ट्रात तर खुपच पेशन्ट वाढतत. मुंबईत तर बघुचीच सोय नाय”

“मुंबईत वाढतले नायतर काय. मुंबईतली लोकसंख्याच इतकी हा की जो तो उठता तो मुंबईत. महाराष्ट्रातलोच नायतर, देशातलो, जगातलो माणूस सुध्दा मुंबईत येवक बघता. इतर येळाक रस्त्यावर चलाक वाव नसता. त्यात ह्यो करोना सारखो भयानक विषाणू, तेका अश्या गर्देत पसराक काय येळ लागता. झोपडपट्ट्यानी तर बघूकच नको १५०-२०० खोलयांसाठी एकत्रच बाथरुम संडास. मग काय सांगुक व्हया. आता ह्या अत्यावश्यक आणि दिनक्रमाच्या कामांसाठी लॉकडाऊन काय कामाचा हा सांग बघू”

“हाहाहा... ”

“कठीण हा बा, पुढे कसा काय होताला देवाकच म्हायत. पावसपण तोंडार इलो हा”

“होय तर, आता ह्या परप्रांतियांसाठी स्पेशल ट्रेन, बस चालू केल्यानी हत. तेंका फुकट गावाक जावक भेटता. आमच्या कोकणासाठी पण अशेच दोन चार ट्रेन चालू करुचे तर नाय. ते एसटी चालू केल्यांनी, ते पण स्वत:चा तिकीट काडून जायचा”

“बघ तरी, आम्ही तर गेल्या पंधरा वर्षात ह्या लाल डब्यान प्रवासच करुक नाय. आताच्या पोरांका तर असल्या प्रवासाची सवयच नाय, त्यांका चक्कर येता, गाडी लागता. कोण ती लफडी काढीत बसतोलोहा”

“आता आपणाक जावचा असला तर स्वत:च पास काढायचो आणि बाकी सगळी परमिशना घेवन स्वत:ची नायतर भाड्याची गाडी घेवन जावचा ह्याच याक उरला हा.”

“होय, पण भाड्यान गाडी करुन जावक काय सगळ्यांका थोडाच परवाडतला”

“ता तर आसाच म्हणा आणि थय जावन तरी काय, १४+१४, २८ दिवस क्वारंटाईन रवाक व्हया”

“होय, आणि क्वारंटाईन करतले थयसर सगळी सोयपण नसतली. परत गावात तसाच काय झाला तर धड औषध पाण्याची सोयपण नाय”

“पण ह्या १०-१२ दिवसात बरेच लोक गावाक गेलेत हा”

“हो, आपलो तो टेमावरचो भाई आणि मदन दोघय आपली बिराडा घेवन गेलेत. पयले जे गेलेत त्यांका शाळेत ठेयल्यांनी आता शाळापण फुल झाली म्हणतत.”

“काय सांगतस”

“होय रे, काय दिवस ईलेहत ते बघ, शहरात पोरांका हायस्कुलात अँडमिशन घेवचा असला तर हायस्कुल फुल होता आणि सध्या गावाक माणसांका क्वारंटाईन करुन ठेवक शाळेत जागा भेटना नाय. कायपण परिस्थिती ईली हा.”

“होय ह्या मात्र खरा बोललस... पण आता कोण कोण जातत तेंका कोणाचा रिकाम्या घर असला तर त्या घरात रवाक परमिशन देतत म्हणता. तो मदन गेलो तेका तेच्या भवकेचा घर हा तेच्यात रवाक दिल्यानी”

“काय सांगतस?”

“होय रे”

“तसा रवाक भेटाला तर बरा हा”

“वाटता बरा पण त्रास पण तसोच हा. तो भाई सांगा होतो, तेका तपासणीसाठी सरकारी हॉस्पिटलात घेवन गेले थय चार तास लायनीत रवाचा लागला. धड पाणीपण नाय भेटना”

“ता तर आसाच, लोकाच इतकी गावाक जावक लागली हत थय सरकार तरी खय सगळ्यांची सोय करताला”

“ता पण खराच म्हणा.”

“आज मदनाक फोन केललय तो सांगा होतो, गावातलो एक माणूस देखील आमच्या आजूबाजूक फिराकना नाय. काय काय लोकांनी तर आमच्या घराकडना जावचे वाटे पण बदलल्यांनी. ग्रामपंचायत, आरोग्य विभागाची माणसा दर दिवशी चौकशीसाठी येतत. ह्या सगळा बघून आम्ही कोरोनाचेच पेशंन्ट आसव की काय असा वाटाक लागला हा.”

“हाहाहा...”

“कठीण हा बा... खराच कठीण हा”

“बरा आपून कधी जावया?”

“कसो जातलस, माका मधी मधी कामार जावचा लागता. तरीपण बघया, अजून थोडे दिवस जावने”

“हो... हो”

“चल बा... माझ्या फोनची बॅटरी संपत ईली हा”

“हो चल, तुका आता दुसरे फोन येवची येळ झाली असतली”

“हाहाहा... तुझा मेल्य़ा काय नकोताच”

“बाय....”


पण खरच पुढे काय होणार हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. हे संकट पुढे कधी संपणार आणि सर्व सुरळीत कधी होणार याचेच तर्क मांडले जात आहेत. सध्या तरी कोणीच निश्चित काही सांगू शकत नाही. एवढच सांगू शकतात की...,

घरी रहा सुरक्षित रहा !



14 comments: