मी लाल रंगाची नवी कोरी लेडीज सायकल खरेदी केली होती. आता मी सायकल घेऊन
आँफीसमध्ये येवू लागली होती. सुरुवातीला घाबरत घाबरत सायकल चालवायची, मात्र काही
दिवसातच सराईतपणे चालवू लागली. तू देखील सायकलनेच यायचास. तूझी सायकल थोडी जूनी
होती त्यामुळे बऱ्याच वेळा ती आजारीच असायची.
माझा २०-२५ मीनिटांचा तो सायकल प्रवास करत असताना आँफीसमध्ये पोचायला
बऱ्याचवेळा उशीरच व्हायचा. तेव्हा तू आँफीसमध्ये बसलेला असायचा. मला चांगलच आठवत,
जेव्हा मला उशीर व्हायचा तेव्हा माझा आँफीसातील प्रवेश अधिकच धावपळीचा असायचा. सायकल
स्टॅण्डला लावून टीफीनची बॅग घेत धावतच प्रवेश करायची आणि त्याच वेगाने खुर्चीत
बसून कामाला सुरुवात करायची.
तेव्हा तूझ्यासहीत इतरही स्टाफ आँफीसमध्ये बसलेला असायचा. कोणी काहीच बोलत
नसायचे. सर्वजण आपापली काम करत असताना तू मात्र मध्येच खाली मान करुन टोमणा
मारल्यागत...
“मॅडमना आज उशीर झाल वाटतं...”
एवढंच बोलून गप्प राहायचास. त्यानंतर मी मात्र रस्ता खराब असल्याच्या नांवाने
दगड फोडत एकटीच बोलत राहायची आणि तू ते ऐकत आपलं काम करत असायचा.
तूझं आँफीसमधील वावरण सकाळच्या काही वेळा पुरतच असायचं. त्यानंतर तूझ जाणं
येणं कुठे असायच याचा काही पत्ताच नसायचा. बऱ्याचवेळा तू आँफीसमध्ये सायकल घेऊन न येता
चालतच यायचास. कधी आँफीसच्या कामानिमित्त बाहेर, कधी सामाजिक कार्या निमित्त
बाहेर, तर काहीवेळा आँफीसच्या वेळेत तू क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटचा आस्वादही
घेत असायचा. असं तुझं ते एकाचवेळी वेगवेगळ्या क्षेत्रात वावरण बघून हेवा वाटायचा.
आँफीस सुटायच्या वेळेलाच कींवा बऱ्याचवेळा मी आँफीसमधून गेल्यानंतरच तू
संध्याकाळच्या वेळेला आँफीसमध्ये यायचास. नाहीतर परस्पर बाहेरुनच घरी जायचास.
सकाळी दर्शन घडल्यानंतर तुझं पुढचं दर्शन संध्याकाळी नाहीतर मग दुसऱ्या दिवशी हे
ठरलेलच असायचं.
कधी कधी मी सायकलने घरी जात असताना तू मात्र त्याच रस्त्याने चालत जाताना
दिसायचास. तेव्हा मात्र मी सायकलाचा थोडा वेग वाढवून निघून जायची. मला त्या खराब
रस्त्यामुळे सायकल चालवायला कंटाळा यायचा कींवा आँफीसमधून निघायला उशीर झाला तर मी
सायकल आँफीसमध्येच ठेवून घरी जायची. असंच एके दिवशी मी माझी सायकल लॉक करुन
आँफीसमध्ये ठेवत असताना नकळत तू मला प्रश्न केलास.
“मॅडम, मी तुमची सायकल घेऊन जावू का?”
आणि मी क्षणाचाही विलंब न लावता ‘हो’ म्हणून तूझ्या समोर
सायकलची चावी ठेवली. त्यानंतर बऱ्याच वेळा तू माझी सायकल घेवून जावू लागलास. माझी
ती लाल रंगाची नाजूक सायकल असली तरीही तूला ती चालवताना बघायला छान वाटायचं.
हळू-हळू या सायकलच्या निमित्ताने आपल्यातील बोलणं वाढत गेल आणि नकळत आपण
एकमेकांच्या जवळ होत गेलो. त्याचाच प्रत्यय म्हणून एके सकाळी तुझ्या तोंडून
निघालेले ते “I Love You” शब्द माझ्या कानावर पडले. तेव्हा
मी मात्र घाबरूनच गेलेली. त्यानंतरचे दोन-तीन महीने मी “Yes-No” च्या मनस्थितीत वावरत होती.
माझा होकार आला नव्हता तरीही तू माझी सायकल घेवून जायच सोडलं नव्हत आणि मीही
ती हक्काने तुला देत होती. कारण सायकलच आमच्यातील मध्यस्थीच काम निभावत होती.
शेवटी मी होकार दिलाच, तेव्हा तुझ्या चहऱ्यावरची लाली आणि त्या सायकलची लाली
अधिकच खुलून उठली होती. पुढे पुढे तू माझी सायकल हक्काने घेऊन जावू लागलास.
कींबहूना माझ्या लव-ली सायकलला तुझ्याच चालवण्याची सवय झाली होती.
अशी ही आपल्याला एकत्र बांधून ठेवणारी आपली लव-ली सायकल होती.
