Friday, August 12, 2016

अवयवदान काळाची गरज

ORGAN DONATION...

अवयवदान एक महादान, अवयवदान हे एक सर्वश्रेष्ठ दानअसे संवाद आपण जाहीरातीतून ऐकत, वाचत असतो. परंतु अद्यापही याकडे डोळस नजरेतून किंवा सामाजिक जाणीवेतून पाहण्याचा दृष्टीकोन हवा तेवढा आलेला नाही. इतर देशांच्या तूलनेत भारत याबाबतीत खूपच पिछाडीवर आहे अस सर्रास आपल्याला वाचायला मिळते. हे काहीस खरं असलं तरीही मागील काही महीन्यात हा आलेख उंचावलेलाही वाचनात येतं. १३ ऑगस्ट हा अवयवदान दिन साजरा करत असताना ही बाब आपल्या देशासाठी नक्कीच आशावादी आहे.

जन्माला आला त्याचा अंत अटळ आहे हे सर्वज्ञात आहे. प्रत्येक सजीवाच्या जीवन क्रमातील तो एक शेवटचा टप्पा आहे. वैध्यक तंत्रज्ञान कीतीही पुढ गेलं तरी हा टप्पा लांबवू शकतो परंतु तो थांबवू शकत नाही. शरीर हे क्षणभंगूर आहे. मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयवदान केल्याने अवयवरुपी जिवंत राहू शकतो हा विचार नागरिकांमध्ये रुजणे आवश्यक आहे. त्यासाठी अवयव दानाचे महत्व तळागाळापर्यंत पटवून देण्याच काम मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहीजे.

माणसाच्या शरीरातील अवयव रिकामी झाला की पेशंटच्या आयुष्याची खात्री देता येत नाही हा समजही मागे पडला. गेल्या दोन दशकांत वैध्यक तंत्रज्ञान, औषध निर्माण क्षेत्राने उत्तुंग झेप घेतली आहे. नव्या प्रतिजैविकांच्या शोधासह, दुर्धर व्याधींशी लढताना कराव्या लागणाऱ्या तपासण्यांपासून रोबोटिक शस्रक्रियांपर्यंत अनेक वैध्यकिय बाबींमध्ये सफाईदारपणा आला आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये आजाराशी लढण्याची ताकद आणि विश्वास निर्माण झाला आहे.

किडनी, डोळे, त्वचा, मुत्रपिंडे, यकृत, फुफ्फुस दानाविषयी समाजामध्ये जागृती होत असली तरी अध्यापही ह्रदय दानाविषयी समाजामध्ये म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. ह्रदय दिले तर मोक्ष मिळत नाही अशी एक अंधश्रध्दाही ह्रदयाचे दान करण्याच्या निर्णयापासून कुटुंबाला परावृत्त करते. नागरीकांनी अंधश्रध्देच्या आहारी न जाता वास्तवाचे भान ठेवून खऱ्या अर्थाने अवयव दानाचे काम करणे महत्वाचे आहे. याबाबत सर्वदूर जागृती नागरीकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे.

मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरु शकतो. तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारु शकतो. अवयव दान दोन प्रकारे केले जाते. एक लाईव डोनेशन (जिवंतपणी) तर दुसरे ब्रेनडेड (मृत्यूपश्चात). ब्रेनडेड अवस्थेतील व्यक्तींचा मृत्यू अटळ असल्याचे डॉक्टर सांगतात ती परिस्थिती नातेवाईकांसाठी खुपच बिकट असते. तरीही ब्रेनडेड शरीरातील अवयव वाया जायला नकोत आणि दुसऱ्या एकाचे आयुष्य वाढणार आहे हा चांगुलपणा दाखवून त्यावेळच्या परिस्थितीला सामोरे जायला पाहीजे. अवयव दान करणारा हा कधीही श्रेष्ठच असतो. परंतु पेशन्ट ब्रेनडेड सारख्या अवस्थेत असताना जेव्हा त्यांचे कुटुंब अवयव दानाचा निर्णय घेतात तेव्हा ते कुटुंब त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते. कारण हा निर्णय बहुतांशी सामुदायिक असतो आणि सामुदायिक निर्णयावर लवकरात लवकर एकमत होणे कठीण असतं.

दिनांक ३ ऑगस्ट २०१५ रोजी मुंबईमध्ये ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रीया यशस्वी झाली. साधारणता ४० वर्षातील मुंबईच्या इतिहासातील पहिली यशस्वी ह्रदयरोग शस्त्रक्रिया पार पडली. कवटीतील अंतर्गत रक्तस्रावामुळे असाध्य ह्रदयरोगाचा सामना करीत असलेल्या व मुंबईत उपचार घेत असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला पुण्यातील ४२ वर्षीय ब्रेनडेड महिलेच्या ह्रदयाने जगण्याची नवी उभारी दिली. डॉक्टरी कौशल्य, यंत्रणांचा समन्वय, समाजातील चांगुलपणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दात्यांच्या कुटुंबाच्या दूरदूष्टीपणामुळे हे शक्य झालं. चार तासाच्या अवधीमध्ये ह्रदयाचे प्रत्यारोपण होणे आवश्यक असताना इकडे पुणे आणि मुंबई या रस्त्यामार्गे किमान चार-पाच तासांचे अंतर असलेल्या दोन शहरांमध्ये या धडधडत्या ह्रदयाला विध्युतवेगाने पोहचवणे वाहतूक यंत्रणासमोर अग्निपरीक्षाच होती. या अग्निपरीक्षेत उतरुण पुण्याच्या जहांगिर हॉस्पिटलपासून मुलुंडच्या फोर्टीस हॉस्पिटलपर्यंत हवाई व स्थानिक रस्ते मार्गाने ठिक तासभरात हे ह्रदय योग्य नियोजनाव्दारे आणले गेले आणि यशस्वी ह्रदयरोपण शस्रक्रीया पार पडली.

त्याच दरम्यान आणखी एका चेंबूरच्या अणुशक्ती नगरमधील ब्रेनडेड वैज्ञानिकांच्या नातेवाईकांनी ह्रदयदानाबरोबर दोन्ही किडनी, लिव्हर, दोन्ही डोळे आणि स्वादूपिंडाचे दान करुन नवा सामाजिक दृष्टीकोन रुजवला आहे. या ब्रेनडेड पेशंटने किमान चार जणांना नवे जीवन आणि दोघांना दृष्टी दिली हे एक अनोखे अवयवदान आहे. अशा प्रकारची नागरीकांमध्ये जागृती निर्माण व्हायला पाहीजे आणि अशा उदाहरणाने यापुढे ती नक्कीच निर्माण होणार आणि ती होतानाही दिसत आहे.

आपण अवयवदानामध्ये मागे राहत असल्याच्या काही कारणांपैकी, हॉस्पीटलमधील समन्वयाचा अभाव आणि अवयवदानाविषयी उदासीनता ही या प्रक्रियेतला सर्वात मोठा अडसर आहे. खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमधील समन्वय नसल्यामुळे दाता आणि पेशंन्ट यांना त्यासंदर्भात पुरेशी कल्पना येत नाही आणि योग्य प्रचार, प्रसार नसल्यामुळे नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी उदासीनता असते. त्यामुळे हॉस्पीटलमधील समन्वय आणि अवयव दानाचा प्रचार आणि योग्य ती माहीती पुरवून नागरीकांना स्वच्छेने अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे काम जोमाने व्हायला पाहीजे.

अवयवदान चळवळ मोहीमेत स्वयंसेवी संस्थामुळे अलिकडे व्यापक जनजागृती होत आहे. अवयवदानाच्या जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांच्यावतीने ६ ते १३ ऑगस्ट या काळात अवयवदान सप्ताह पाळण्यात येतो. मुंबई महापालिकेने म्युनिसिपल ऑर्गन ट्रान्सप्लान्ट ऑर्गनायझेशन (मोटो) या नावाने केंद्र सुरु केले आहे. त्याचप्रमाणे या चळवळीत झोनल ट्रान्सप्लास्ट कोऑर्डिनेशन सेंटरची (झेडटीसीसी) भूमिका मोलाची ठरताना दिसत आहे. यासाराखी केंद्रे, संस्था जोमाने काम करत आहेत. अवयवदानासाठी मृतांच्या नातेवाईकांचे कौन्सिलिंग करणे, ब्रेनडेड पेशंटचा शोध घेणे, त्यांची माहीती ठेवणे अशी कामे या केंद्रामार्फत करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

या सर्वांबरोबरच राज्य सरकारकडून अवयव प्रत्यारोपणासंदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती करणे गरजेचे आहे. मागील वर्षी मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ह्रदय प्रत्यारोपणाची मुंबईतील पहिली यशस्वी शस्रक्रीया पार पडली. त्यावेळी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी त्या पेशंट आणि डॉक्टरांची भेट घेतली त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अवयव प्रत्यारोपणासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात सर्व माध्यमांतून जाणीव, जागृती करणार, रस्त्यावरील वाहतुकींची अडचण लक्षात घेता अँम्ब्युलन्ससाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था (ग्रीन कॉरिडॉर) करण्याचा विचार आहे. तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत मुत्रपिंड प्रत्यारोपण केलेल्या पेशंटबरोबरच दात्यांच्या मदतीचाही विचार केला जाईल अशा गोष्टींचा उल्लेख केला होता. यासारख्या योजनांचा पाठपुरावा करुन त्या प्रत्यक्ष अंमलात आणणे अत्यावश्यक आहे. तरच या अवयवदानाला चालना मिळेल आणि आश्वासनांनाही महत्व प्राप्त होईल.

तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य आहे हे आपण नेहमीच म्हणत असतो त्यामुळे या तारुण्यांतच अशा प्रकारचे शिक्षण मिळाल्यास त्यांना या गोष्टींची सवय होईल आणि पुढील कामे सोपी होतील. म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश करुन अवयवदानाचे धडे देवून त्याचे महत्वही अधोरेखित व्हायला हवेत. शाळा, कॉलेजांतून यासंदर्भात चर्चासत्र, परिसंवादही व्हायला हवेत.

भारतातील नागरीकांचा अवयव दानाकडे पाहण्याचा रोख निश्चितच बदलत आहे तो अजूनही आश्वासकरित्या बदलायला हवा आणि हे बदलण्यासाठी वरील काही उपायांसहीत सामाजिक दातृत्वाचीही गरज आहे याचे भान ठेवून अवयवदानामध्ये नागरिकांनी पुढाकार घेतल्यास आत्ता दिसत असलेले चित्र अधिकच सुंदर होण्यास वेळ लागणार नाही.

- भरत माळकर