विरार स्टेशनवरुन निघालेल्या फास्ट ट्रेनचे बोरीवली स्टेशननंतर ब्रेक फेल झाल्याचे समजते. त्यानंतर झालेली अवस्था एका डब्यातील प्रवाशांच्या नजरेतून.....
आज माझ्या मुंबईतील ट्रेनच्या प्रवासाला बरोब्बर नऊ महीने नऊ दिवस झाले. विरार-नालासोपारातून पहिल्या लेडीज डब्यानंतरचा आमचा हा डबा. आता लेडीज डब्या लगतचाच डबा का पकडायचे हे नव्याने सांगायला नको... चर्चगेटला वेगवेगळ्या ऑफीसमध्ये काम करणारे आम्ही एकूण सतराजण नियमितपणे सकाळी ८:१५ ची विरारवरुन निघणाऱ्या ट्रेनने प्रवास करतो. आता विरार ते चर्चगेट हा साधारणता दिड तासाचा प्रवास करुन ऑफीसमध्ये ताजतवाणं जाणं तेवढंच महत्वाच पण जिगरीच काम असायचं. यावर उपाय म्हणून आम्ही भजन गायला सुरुवात केली. देवाच नामस्मरण करत-करत चर्चगेट गाठण्याचा आमचा हा नित्याचा कार्यक्रम ठरला. सर्वजण तेवढ्याच आत्मीयतेने भाग घ्यायचे. मला मात्र भजनाची फारशी आवड नसल्यामुळे (नाहीच म्हणा ना) कोपऱ्यातील सीटवर बसायचो आणि मस्त डुलकी काढायचो.
आठवड्याचा पहीला दिवस, सोमवार होता. नेहमीप्रमाणे सर्वांनी ठरलेल्या डब्याचा कब्जा घेतला आणि काहीवेळातच भजनाला सुरुवात झाली आणि माझ्या झोपेची घटीका भरली. भजन कधी नव्हे ते आज खुपच बहरत चाललं होत. प्रत्येक अभंगामागे भजनाचे रंग गडद होत होते. परंतु माझ्या डुलकीने मात्र या सर्वावर मात करत गाढ झोपेचा ताबा घेतला.
बोरीवली स्टेशनवरुन ट्रेन पास झालेली तेवढ्यातच गाडीचे ब्रेक फेल झाल्याची बातमी कानावर येऊ लागली. हा...हा म्हणता ही बातमी फास्ट ट्रेनच्या वेगापेक्षाही फास्ट पूर्ण ट्रेनमध्ये पसरली होतीच. भजनातील टाळ, मृदुंगाच्या आवाजाला छेदून गाडीच्या ब्रेक फेलच्या चर्चाच अधिक कानावर येऊ लागल्या. आता आम्ही मरणार हे मात्र नक्की होत. आमच्या भजनातील रंगचा बेरंग झाला होता. सर्व वाद्य, सर्वांचे आवाज बंद होवून एकमेकांवर निरागस, भयभित नजरेतून पाहू लागले. हा आपला शेवटचा प्रवास आणि शेवटचं भजन असल्याने निदान या भजनाचा तरी आस्वाद घ्यावा या उद्देशाने अभंगरुपी नामस्मरण बंद न करण्याचं ठरलं आणि पुन्हा एकदा आमच्या बुवांनी भजनाला सुरुवात केली. परंतु कंठातून ध्वनी बाहेर येताना रडव्या स्वरात अडकून पडलेल्या शेवटच्या प्रवासातील भजनातील अभंग विसरुन अंत्यविधीतील गाणीच बाहेर येऊ लागली.
कोणं म्हणत होतं...
'अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी.........'
तर कोण गात होतं....
'अपुल्या हाती नसते काही हे समजावे.......'
'जीवलगा राहीले दूर घर माझे........'
इथपासून ते
'सखी मंद झाल्या तारका.......'
.....इथपर्यंत, अश्याच गाण्यांची चढाओड लागली होती.
शेवटी राम नाम सत्य है...! म्हणत सर्वांनी विश्रांती घेतली.
तेवढ्यातच एकजण आपल्याला देहदान करायची इच्छा असल्याचे बोलू लागला. त्याला होकार देत प्रत्येकजण एका पेपरवर आपल्याला कोणता कोणता अवयव दान करायचा आहे त्याची यादीच बनवून त्यावर सही घेवू लागला. काहीजणं आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी कशी करावी याचा तपशिल तयार करतात तर काहीजण आपली सेल्फी काढून आपल्या नातेवाईकांना व्हॉटस्अॅप वर पाठवत असतात. जेणेकरुन आपली फोटोफ्रेम त्यांना बनवता येईल अश्या विचारापर्यंत लोकांची मजल गेलेली.
हे सगळं होत असताना आता शेवटी बारावं-तेरावं करायचही ठरतं. मग प्रत्येकजण आपापला टीफीन काढतात आणि स्वत:च स्वत:च्या बाराव्या-तेराव्याच जेवण समजून टीफीन रिकामे करतात.
मीही माझा हात जेवणाचा घास समजून तोंडात घालतो आणि करर.... चावतो. त्यावेळी कुठे मला झोपेतून जाग येते आणि मी समजत असलेली ही बिकट अवस्था म्हणजेच मला पडलेलं एक दिव्य स्वप्न असल्याची खात्री होते. तोपर्यंत चर्चगेट स्टेशनवर ट्रेन थांबलेली होती आणि माझे सर्व सहकारी देखील खाली उतरुन कामावर जायला निघत होते.
- भरत माळकर, मुंबई




